राज्यात गेल्या अनेक महिन्यांपासून मनसे-भाजपा युतीची चर्चा रंगली आहे, मात्र अद्याप याबाबत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. मधील काळात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आणि राज ठाकरेंच्या भेटींमुळे लवकरच यावर शिक्कामोर्तब होईल असं वाटत होतं. मात्र ही चर्चा पुन्हा एकदा थंडावलेली असतानाच भाजपा नेते प्रसाद लाड राज ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचल्याने पुन्हा एकदा भुवया उंचावल्या आहेत. प्रसाद लाड यांनी भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सूचक विधानदेखील केलं.

मुंबई जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भात आपण भेट घेतल्याचं प्रसाद लाड यांनी यावेळी सांगितलं. ते म्हणाले की, “आजची भेट मुंबई जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भातील होती. मुंबई जिल्हा बँकेत सर्व पक्षाच्या नेतृत्वाने सहकार पॅनेलसोबत जाण्याचा निर्णय घेतला. राजकीय मतभेद बाजूला ठेऊन ही निवडणूक झाली पाहिजे हा सर्वांचा प्रयत्न होता. त्याचबाबतीत राज ठाकरेंची भेट घेतली. फोनवरुन प्रवीण दरेकर आणि त्यांचं बोलणंही करुन दिलं. लवकरच प्रवीण दरेकर त्यांच्या भेटीला येतील आणि राज ठाकरे सहकार पॅनसोबत येतील तसंच निवडणूक बिनविरोध होईल असा आम्हाला विश्वास आहे”.

भाजपा आणि मनसेची जवळीक वाढली असून मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने याकडे पहायचं का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “राजकीय दृष्टीने पहायचं झाल्यास सर्वच बाबतीत पाहता येईल. पण मी वेळोवेळी राज ठाकरेंना भेटत असतो. दोन राजकीय नेते भेटले की राजकीय चर्चा होतच असते. पण याबाबतीला जो काही निर्णय आहे तो राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांचाच असेल. पुढचं मी सांगणं योग्य नाही”.

पुढे ते म्हणाले की, “गेल्याच महिन्यात देवेंद्र फडणवीसही राज ठाकरेंना भेटून गेले आहेत. सध्या आमच्यासमोर जिल्हा बँक निवडणूक आहे. मुंबईत सहकार पॅनेल निवडून आणणं महत्वाचं असून त्यासाठीच हा प्रयत्न होता. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आमच्यासोबत असून मनसेलाही सोबत घेऊन सहकारातील पुढील वाटचाल करण्याचा प्रयत्न आहे”