भाजपा आमदार आशिष शेलार यांच्याविरुद्ध मुंबईत गुन्हा दाखल झालेला असताना त्यावरून शहरातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आशिष शेलार यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविषयी आक्षेपार्ह उल्लेख केल्याचा आरोप शिवसेना आणि खुद्द महापौरांनी केला आहे. यासंदर्भात आशिष शेलार यांच्याविरोधात मरीन ड्राईव्ह पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे. यासंदर्भात आता भाजपाकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत असून भाजपा नेते प्रसाद लाड यांनी त्यावर सूचक प्रतिक्रिया दिली आहे.

एकीकडे आशिष शेलार मरीन ड्राईव पोलीस ठाण्यात हजर होत असताना दुसरीकडे प्रसाद लाड यांनी अशा प्रकारचं विधान करण्यावरून तर्क-वितर्क काढले जात आहेत. “आगे आगे देखो होता है क्या.. कळेल तुम्हाला. एकदा आशिष शेलार यांना जामीन मंजूर होऊ देत. मग आशिष शेलार आणि प्रविण दरेकर तुम्हाला सांगतील”, असं प्रसाद लाड म्हणाले आहेत.

“आता संघर्षाचं रणशिंग फुंकलं आहे”

दरम्यान, या मुद्द्यावरून आशिष शेलार यांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावरून प्रसाद लाड यांनी सरकारवर निशाणा साधला. “सरकारी यंत्रणा पोलीस यंत्रणेचा गैरवापर करून आमच्या लोकांवर दबाव टाकण्याचं काम होत आहे. ते निषधार्ह आहे. आम्ही त्याचा निषेध करतो. ज्या पद्धतीने यंत्रणा वापरली जात आहे, त्याला भाजपा घाबरत नाही. भाजपा संघर्षाची पार्टी आहे. आम्ही अटकेला घाबरत नाही. आम्ही संघर्षाला तयार आहोत. आता संघर्षाचं रणशिंग फुंकलं आहे”, असं प्रसाद लाड म्हणाले.

“मुस्कटदाबी करणाऱ्यांना मी एवढंच सांगेन…”, गुन्हा दाखल झाल्यानंतर आशिष शेलार यांचं टीकास्त्र

नेमका वाद काय आहे?

वरळीच्या बीडीडी चाळीतील दुर्घटनेनंतर आशीष शेलार यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. तिथे सिलिंडरचा स्फोट होऊन चार महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला आणि पाठोपाठ त्याच्या वडिलांनाही प्राण गमवावे लागले. मुंबईच्या महापौर मात्र ७२ तास उलटल्यानंतर रुग्णालयात पोहोचल्या. याच मुद्द्यावरुन शेलार यांनी महापौरांना लक्ष्य केले होते. नायर रुग्णालयात गेलेल्या जखमींना तब्बल ४५ मिनिटे उपचारांविना तसेच ठेवले गेले. त्यांच्यावर औषधोपचार नाही किंवा विचारपूसही करण्यात आली नाही. या बेफिकिरीमुळे चार महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाला, असे नमूद करत शेलार यांनी महापौरांवर टीका केली होती.

“…एवढे तास कुठे निजला होतात”, आशिष शेलारांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर महापौर पेडणेकरांची थेट गृहमंत्र्यांकडे तक्रार

आशिष शेलार म्हणाले होते, “७२ तास तुम्ही का पोहचला नाही? करून दाखवलं म्हणता ना, मग कुठं निजवून दाखवलं होतं? झोपला कुठं होतात? झोपला कुठं होतात या अर्थाने मी हा शब्द वापरतो आहे. निजणं म्हणजे झोपणं. या अर्थाने झोपला कुठं होतात हा प्रश्न विचारला तर यात गैर काय?”