दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्यानंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. महाविकास आघाडीकडून एकनाथ शिंदेवर टीका होत असून, भाजपा नेते उद्धव ठाकरेंना लक्ष्य करत आहेत. भाजपा नेते प्रसाद लाड यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली असून ‘सोनं नाही तर भंगार लुटलं’ असा टोला ‘एबीपी माझा’शी लगावला आहे.

“टोमण्यांच्या पलीकडे या भाषणात काहीच नव्हतं. मी टोमणे मारतोय का हे त्यांना वारंवार विचारावं लागत होतं. जो टोमणे मारतो त्याला विचारावं लागत नाही. या भाषणात टोमणे आणि अहंकाराच्या पलीकडे काही नव्हतं. बाळासाहेबांच्या भाषेत बोलायला गेलं तर फार बोगस भाषण होतं,” अशी टीका प्रसाद लाड यांनी केली आहे.

एकनाथ शिंदे शिवसेना पक्षप्रमुख पदावर दावा करणार?

“जनतेला कोणतंही सोनं मिळालं नाही. सोन्याच्या रुपात पितळही मिळालं नाही. ना चांदी मिळाली, ना पितळ मिळाल, फक्त भंगार मिळालं. भंगारवाल्यांसह सत्तेत राहिल्याने भंगारच लुटायची वेळ आली आहे. भंगारच लुटायचं काम त्यांनी केलं,” असा टोलाही त्यांनी लगावला.

‘शिवसेनेचा झेंडा आणि राष्ट्रवादीचा अजेंडा’, CM शिंदेंच्या टीकेला अजित पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले “माझ्या बाजूला बसायचे तेव्हा…”

“सर्जिकल स्ट्राइक कोणी केला हे उद्धव ठाकरे विसरलेत. अमित शाहांवर टीका करण्याइतकी तुमची उंची नाही. तुम्ही साधं याकूब मेमनची कबर उकरु शकला नाहीत. अमित शाहांबद्दल, पाकव्याप्त काश्मीरबद्दल बोलूच नये. मोदी, शाह हे पाकव्याप्त काश्मीर कधी भारतात घेतील हे तुम्हाला कळणारही नाही. तुमची सकाळ दुपारी १२ वाजता होते, त्यामुळे रात्री पाकव्याप्त काश्मीर कधी येईल हे तुम्हाला समजणारही नाही. आजुबाजूच्या ज्ञान देणाऱ्या त्या चांडाळ चौकडीचं ज्ञान आधी वाढवा,” असंही ते म्हणाले.