scorecardresearch

BJP Protest: “नवाब मलिकांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ३० ते ४० हजार लोक मोर्चात येणार, फडणवीसांनी आदेश…”

देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेमध्ये आपल्या भाषणादरम्यान मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करत राज्य सरकारवर टीका केली.

bjp march
आज मुंबईमध्ये भाजपाचा मोर्चा (फाइल फोटो)

महाविकास आघाडीतील सत्तारूढ शिवसेना आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपामध्ये मंगळवारी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या गेल्या. राज्य सरकारने भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांना खोट्या गुन्ह्यांत अडकविण्याचे कारस्थान रचल्याचा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला. त्याचप्रमाणे फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली. मागील अनेक दिवसांपासून सुरु असणाऱ्या नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज भाजपाने मुंबईत मोर्चा काढण्याचा निर्णय घेतलाय. या मोर्चाला ३० ते ४० हजार लोक उपस्थित असतील असा दावा भाजपाने केलाय.

३० ते ४० हजार लोक अपेक्षित
भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी प्रसारमाध्यमांना या मोर्चासंदर्भात माहिती दिली. “हा (नवाब मलिकांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठीचा) मोर्चा भारतीय जनता पार्टीच्या मुंबई आणि एमएमआर परिसरातून येणारा मोर्चा आहे. या मोर्चाला किमान ३० ते ४० हजार लोक अपेक्षित आहेत,” असं लाड यांनी म्हटलंय. आजाद मैदानामध्ये या मोर्चासाठी भाजपा कार्यकर्त्यांची गर्दी होण्यास सुरुवात झालीय.

फडणवीस यांनी आदेश दिले…
“काल मुंबई पोलीस आयुक्त, मुंबई सहपोलीस आयुक्तांसोबत बैठक झाल्यानंतर आम्हाला एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे त्यांनी केलेली विनंती. मुंबईमध्ये बारावीच्या परीक्षा असल्याने भायखळ्यापासून आजाद मैदानापर्यंत मोर्चा घेऊन जाऊ नये ही विनंती त्यांनी केली. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. देवेंद्र फडणवीस या मोर्चाचं नेतृत्व करत आहेत. त्यामुळे त्यांनी देखील आम्हाला आदेश दिल्याने आम्ही हा मोर्चा आजाद मैदानात करणार आहोत. आजाद मैदानाकडून पोलिसांनी परवानगी दिली तर आम्ही पुढे जाऊ,” असं लाड यांनी स्पष्ट केलंय. सकाळपासूनच आजाद मैदानावर या मोर्चाची तयारी सुरु आहे.

विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन…
नवाब मलिकांच्या राजीनाम्यासंदर्भात आज सकाळी भाजपाच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवरही आंदोलन केलं. देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेमध्ये आपल्या भाषणादरम्यान मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करत राज्य सरकारवर टीका केली.

कोणता संदेश महाविकास आघाडीला द्यायचाय?
मुंबईतील निष्पापांचा बळी घेणाऱ्या १९९३ च्या बॉम्बस्फोटांचा आणि अनेक देशविरोधी कारवायांचा सूत्रधार दाऊद इब्राहिम याची बहीण हसीना पारकर हिच्याबरोबर संगनमत करून अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांच्या कुटुंबियांच्या कंपन्यांनी मोक्याच्या जमिनी खरेदी केल्या. मुनीरा यांची जमीन खोटे मुखत्यारपत्र तयार करुन विकत घेण्यात आली आणि त्यांना पैसेही देण्यात आले नाहीत. कुर्ला येथे त्यावेळी दोन हजार रुपये चौ.फूट दर असताना केवळ २५ रुपये चौ.फुटाने जमीन खरेदी केल्याचे दाखविले गेले व तीही रक्कम दिली गेली नाही. हसीना पारकर यांनी सुमारे ६०० कोटी रुपयांचे जमिनींचे व्यवहार केल्याचे आढळून आले आहे. मलिक यांनी कुर्ला येथील जमीन बॉम्बस्फोट प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या सरदार शहावली खान आणि सलीम पटेल या हसीना पारकर यांच्या हस्तकांकरवी खरेदी केली. अनिल देशमुख आणि संजय राठोड या मंत्र्यांचा राजीनामा आरोप झाल्यावर घेण्यात आला. मात्र, मलिक यांनी देशद्रोह्यांशी आर्थिक व्यवहार करुनही त्यांचा राजीनामा घेण्यात आला नाही. त्यामुळे त्यांना वेगळा न्याय कशासाठी आणि त्यातून कोणता संदेश महाविकास आघाडीला द्यायचा आहे,” असा सवाल फडणवीस यांनी केला.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp protest march to demand nawab malik resignation 30000 to 40000 people expected to join protest scsg

ताज्या बातम्या