राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपाने आज मुंबईमधील आजाद मैदानामध्ये आयोजित केलेल्या धडक मोर्चामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. मात्र आंदोलक शांत झाल्यानंतर फडणवीस यांना काही वेळाने सोडून देण्यात आलं. फडणवीस यांच्यासहीत भाजपाच्या अन्य नेत्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. मागील अनेक दिवसांपासून सुरु असणाऱ्या नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपाकडून केली जात होती. याच मागणीसाठी आज भाजपाने मुंबईत मोर्चा काढलाय. या मोर्चाला ३० ते ४० हजार लोक उपस्थित असतील असा दावा भाजपाने केलाय.

मलिक यांच्या राजीनाम्यावरुन राजकारण तापलं…
नवाब मलिक यांच्या राजीनाम्याचा विषय राज्यातील राजकारणामधील संघर्षाचा मुद्दा झालाय. भाजपाकडून सातत्याने नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. मात्र त्यावेळी दुसरीकडे महाविकास आघाडी सरकार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मलिक यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच येत नाही असं म्हणत ही मागणी फेटाळून लावलीय. असं असतानाच आज भाजपाने मलिक यांच्या राजीनाम्यासाठी मुंबईमध्ये धडक मोर्चाचं आयोजन केलं आहे.

nashik 60 lakh machinery stolen marathi news
यंत्रसामग्री चोरीचा गुन्हा दाखल होण्यासाठी पाच वर्षे फरफट, दिंडोरी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तक्रारदाराचा संशय
two accused arrested in Salman Khan house firing case (1)
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोघांना गुजरातमधून अटक, पोलिसांनी व्हिडीओ केला शेअर
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!

नक्की वाचा >> भाजपा नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी मोर्चा काढतीये असं पत्रकारांनी म्हणताच राऊत म्हणाले, “मला असं वाटतं की…”

पोलिसांशी संघर्ष नको अशी भाजपाची भूमिका…
मात्र बारावीच्या परीक्षा सुरु असल्याने भाजपा कार्यकर्त्यांना पोलिसांशी संघर्ष करु नका असे आदेश देण्यात आलेत. कायदा सुव्यस्थेची परिस्थिती निर्माण होऊ बारावीच्या विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या असं फडणवीस यांनी सांगितल्याचा दावा भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. त्यामुळेच आजाद मैदानामधून मेट्रो सिनेमा मार्गे हा मोर्चा विधानभवनाकडे जाण्यास निघाला असता पोलिसांनी मोर्चाचं नेतृत्व करणाऱ्या फडणवीस यांची वाट अडवून त्यांना ताब्यात घेतलं. फडणवीस हे पोलिसांच्या व्हॅनमध्ये चढले. त्यापाठोपाठ भाजपाचे अन्य नेते ज्यामध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपा आमदार आशिष शेलार आणि अन्य नेतेही व्हॅनमध्ये चढले. काही वेळानंतर या सर्व नेत्यांना पोलिसांनी सोडून दिलं.

नक्की वाचा >> “राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, सावित्रीबाईंची चेष्टा केली त्याच्याविषयी विरोधी पक्षनेत्यांनी…”; राऊतांची टीका

३० ते ४० हजारांची गर्दीची अपेक्षा…
भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी प्रसारमाध्यमांना या मोर्चासंदर्भात माहिती दिली. “हा (नवाब मलिकांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठीचा) मोर्चा भारतीय जनता पार्टीच्या मुंबई आणि एमएमआर परिसरातून येणारा मोर्चा आहे. या मोर्चाला किमान ३० ते ४० हजार लोक अपेक्षित आहेत,” असं लाड यांनी म्हटलंय. आजाद मैदानामध्ये या मोर्चासाठी भाजपा कार्यकर्त्यांची गर्दी होण्यास सुरुवात झाली होती.

फडणवीस यांनी आदेश दिले…
“काल मुंबई पोलीस आयुक्त, मुंबई सहपोलीस आयुक्तांसोबत बैठक झाल्यानंतर आम्हाला एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे त्यांनी केलेली विनंती. मुंबईमध्ये बारावीच्या परीक्षा असल्याने भायखळ्यापासून आजाद मैदानापर्यंत मोर्चा घेऊन जाऊ नये ही विनंती त्यांनी केली. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. देवेंद्र फडणवीस या मोर्चाचं नेतृत्व करत आहेत. त्यामुळे त्यांनी देखील आम्हाला आदेश दिल्याने आम्ही हा मोर्चा आजाद मैदानात करणार आहोत. आजाद मैदानाकडून पोलिसांनी परवानगी दिली तर आम्ही पुढे जाऊ,” असं लाड यांनी स्पष्ट केलंय. सकाळपासूनच आजाद मैदानावर या मोर्चाची तयारी सुरु आहे.

नक्की वाचा >> “…तर महाराष्ट्र पोलिसांना ED, CBI कडे पाठवावं लागेल”; फडणवीसांच्या आरोपांवर राऊतांची पहिली प्रतिक्रिया

विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन…
नवाब मलिकांच्या राजीनाम्यासंदर्भात आज सकाळी भाजपाच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवरही आंदोलन केलं. देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेमध्ये आपल्या भाषणादरम्यान मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करत राज्य सरकारवर टीका केली.

कोणता संदेश महाविकास आघाडीला द्यायचाय?
मंगळवारी याच मुद्द्यावरुन फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती. “ मुंबईतील निष्पापांचा बळी घेणाऱ्या १९९३ च्या बॉम्बस्फोटांचा आणि अनेक देशविरोधी कारवायांचा सूत्रधार दाऊद इब्राहिम याची बहीण हसीना पारकर हिच्याबरोबर संगनमत करून अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांच्या कुटुंबियांच्या कंपन्यांनी मोक्याच्या जमिनी खरेदी केल्या. मुनीरा यांची जमीन खोटे मुखत्यारपत्र तयार करुन विकत घेण्यात आली आणि त्यांना पैसेही देण्यात आले नाहीत. कुर्ला येथे त्यावेळी दोन हजार रुपये चौ.फूट दर असताना केवळ २५ रुपये चौ.फुटाने जमीन खरेदी केल्याचे दाखविले गेले व तीही रक्कम दिली गेली नाही. हसीना पारकर यांनी सुमारे ६०० कोटी रुपयांचे जमिनींचे व्यवहार केल्याचे आढळून आले आहे. मलिक यांनी कुर्ला येथील जमीन बॉम्बस्फोट प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या सरदार शहावली खान आणि सलीम पटेल या हसीना पारकर यांच्या हस्तकांकरवी खरेदी केली. अनिल देशमुख आणि संजय राठोड या मंत्र्यांचा राजीनामा आरोप झाल्यावर घेण्यात आला. मात्र, मलिक यांनी देशद्रोह्यांशी आर्थिक व्यवहार करुनही त्यांचा राजीनामा घेण्यात आला नाही. त्यामुळे त्यांना वेगळा न्याय कशासाठी आणि त्यातून कोणता संदेश महाविकास आघाडीला द्यायचा आहे,” असा सवाल फडणवीस यांनी केला.