मुंबई : जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिलेल्या शववाहिनीवर भाजपचे नेते व विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांचे फोटो झळकल्याने नागरिकांकडून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. या शववाहिनीवर नार्वेकर कुटुंबातील नगरसेवक ॲड. मकरंद नार्वेकर, हर्षिता नार्वेकर व डॉ. गौरवी नार्वेकर यांचीही छायाचित्रे आहेत. अंत्ययात्रेतही प्रसिद्धी मिळवण्याची ही धडपड समाजमाध्यमावर टीकेचा विषय ठरला आहे.

अनेक संस्था, मंडळे आणि लोकप्रतिनिधी आपापल्या विभागात शववाहिनीची सुविधा उपलब्ध करून देत असतात. स्वतःचे मोठे फोटो लावून श्रेय घेण्याच्या चढाओढीतून शववाहिन्याही सुटलेल्या नाहीत. कुलाबा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या सोयीसाठी ॲड. राहुल नार्वेकर यांच्या माध्यमातून अंत्ययात्रेसाठी शववाहिनी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र, त्यावर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांपासून स्थानिक नगरसेवकांची छायाचित्रे लावण्यात आली आहेत.

शववाहिनीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य नेत्यांचे चेहरे झळकत आहेत. तसेच, प्रभाग क्रमांक २२५ मधील नगरसेविका हर्षिता नार्वेकर, प्रभाग क्र. २२६ चे मकरंद नार्वेकर व प्रभाग क्र. २२७ च्या गौरवी शिवलकर यांचीही छायाचित्रे लावण्यात आली आहेत.

याबाबत राहुल नार्वेकर यांच्याशी लघुसंदेश आणि दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क होऊ शकला नाही. तसेच, हर्षिता नार्वेकर यांच्याशी संपर्क साधला असता, याप्रकरणी माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.

जाहिरात सोस

राजकीय जाहिरातबाजीवरून सत्ताधारी कायमच चर्चेत असतात. मात्र, शववाहिनीला प्रसिद्धीचे माध्यम बनविण्यात आल्याने नार्वेकर यांच्यावर समाजमाध्यमातून टीका होऊ लागली आहे. जवळच्या व्यक्तीचा मृत्यू हा त्या कुटुंबासाठी, आप्तांसाठी, परिसरासाठी अत्यंत संवेदनशील आणि भावनिक प्रसंग. तेथेही राजकीय जाहिरातबाजीची गरज काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सत्ताधाऱ्यांचे हे कृत्य नैतिकतेला धरून नाही. तसेच, श्रेय आणि प्रसिद्धी मिळविण्यासाठी रुग्णवाहिका, बसथांबे, शववाहिनी यांचा वापर केला जाऊ नये, अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून उमटू लागल्या आहेत.