विद्यामान १९ आमदारांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह , अनेक मतदारसंघांत इच्छुक नाराज
मुंबई : लोकसभा निवडणुकीत भाकरी फिरविल्याने मोठा फटका बसलेल्या भाजपने ९९ उमेदवारांच्या यादीत बहुतांश आमदारांना पुन्हा संधी दिली आहे. रविवारी जाहीर झालेल्या पहिल्या यादीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील या पहिल्या फळीतील नेत्यांचा समावेश आहे. मात्र यादी जाहीर होताच अनेक मतदारसंघांत बंडाचे वारे वाहू लागले असून काही नाराज नेते बंडाच्या पवित्र्यात आहेत.
महायुतीच्या जागावाटपात तिढा सुटला नसताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी शनिवारी चर्चा झाल्यानंतर भाजपने पहिली यादी रविवारी दुपारी जाहीर केली. यादीत १३ महिलांना स्थान देण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीत धक्कातंत्र वापरत अनेक खासदारांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. याचा फटका बसल्याने ८० विद्यामान आमदारांना पुन्हा उमेदवारी जाहीर झाली असून १९ नवे चेहरे समाविष्ट करण्यात आले आहेत. ऐरोलीतून गणेश नाईक व बेलापूरमधून मंदा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. बेलापूर मतदारसंघातून उमेदवारी मिळेल या आशेवर असलेले गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांचा भ्रमनिरास झाला असून आता त्यांच्या भूमिकेकडे लक्ष असेल. वर्सोवा येथील आमदार भारती लव्हेकर यांच्याविरोधात मोठी नाराजी असून येथे भाजप अन्य नावांवर विचार करीत आहे. घाटकोपर येथील आमदार पराग शहा यांनाही उमेदवारी देण्यात आली नसून येथून निवडणूक लढविण्यासाठी माजी मंत्री प्रकाश मेहता यांनी तयारी केली आहे. उमेदवारी न मिळाल्यास ते बंडखोरी करण्याची शक्यता आहे. बोरीवलीतून लढण्यासाठी माजी खासदार गोपाळ शेट्टी इच्छुक असल्याने या जागेसाठीचा उमेदवारही जाहीर करण्यात आलेला नाही. भाजपचे मुंबई अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांना वांद्रे पश्चिममधून उमेदवारी मिळाली असून त्यांचे सख्खे बंधू विनोद शेलार यांना मालाडमधून उमेदवारी जाहीर झाली आहे. कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यातच गोळीबार केल्याने त्यांना अटक झाली होती. त्यांना भाजपने उमेदवारी नाकारली असून त्यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना देण्यात आली आहे.
हेही वाचा >>> जोगेश्वरी पूर्वमध्ये गुरु शिष्य लढाई होणार ? वायकरांच्या मतदार संघात एकेकाळचा कार्यकर्ता अनंत नर लढणार ?
पश्चिम महाराष्ट्रातही पक्षांतर्गत असंतोष मोठ्या प्रमाणावर आहे. गेल्या वेळी विधानसभेला उमेदवारी नाकारलेल्या प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना कामठी मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. विद्यामान आमदार टेकचंद सावरकर यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आलेली नाही. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश करूनही त्याचा पक्षाला फारसा फायदा झाला नसला तरी माजी मुख्यमंत्री व खासदार अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना भोकरमधून उमेदवारी मिळाली आहे. नाशिकमध्ये काही जणांनी बंडाचा इशारा दिला आहे. नाशिक मध्य मतदारसंघातील आमदार देवयानी फरांदे यांचे नाव मंत्रीपदासाठी कायम आघाडीवर होते. पण त्यांना पहिल्या यादीत स्थान मिळालेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये काही वर्षांपूर्वी दाखल झालेले ज्येष्ठ नेते व आमदार बबनराव पाचपुते यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव उमेदवारी नाकारण्यात आली असली तरी त्यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची राज्यपालपदी नियुक्ती झाल्याने फुलंब्री मतदासंघातून अनुराधा चव्हाण यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
जातीय समीकरण जुळविण्याचा प्रयत्न
भाजपने जातीचे समीकरण साधण्याचा प्रयत्न केला आहे. लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षण आंदोलनाचा फटका भाजपला बसल्याच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यात सर्व विद्यामान मराठा समाजाच्या आमदारांना उमेदवारी देण्यात आली आहे. मराठा, ओबीसी, आदिवासी, भटके विमुक्त अशा सर्व समाज घटकांना सामावून घेण्यात आले आहे.
फडणवीसांच्या सचिवाबाबत निर्णय नाही
आर्वीचे आमदार दादाराव केचे यांना अद्याप उमेदवारी जाहीर झाली नसून त्या मतदारसंघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहिलेले सुमीत वानखेडे इच्छुक आहेत. या जागेचा निर्णय अद्यापही प्रलंबित आहे. फडणवीस यांचे खासगी सचिव म्हणून पूर्वी काम पाहिलेले आमदार अभिमन्यू पवार यांना दुसऱ्यांदा उमेदवारी मिळाली आहे.
प्रतीक्षेतील विद्यामान आमदार
प्रकाश भारसाकळे (आकोट), हरीश पिंपळे (मूर्तीजापूर), लखन मलिक (वाशिम), दादाराव केचे (आर्वी), विकास कुंभारे (नागपूर मध्य), टेकचंद सावरकर (कामठी), देवराव होळी (गडचिरोली), संदीप धुर्वे (अर्णी), नामदेव ससाणे (उमरखेड), दिलीप बोरसे (बागलाण), सुनील राणे (बोरीवली), भारती लव्हेकर (वर्सोवा), पराग शहा (घाटकोपर), रवीशेठ पाटील (पेण), भीमराव तापकीर (खडकवासला), सुनील कांबळे (पुणे कॅन्टोनमेंट), लक्ष्मण पवार (गेवराई), समाधान आवताडे (पंढरपूर), राम सातपुते (माळशिरस), देवयानी फरांदे (नाशिक मध्य)
लोकसभेतील पराभूतांना संधी
ज्या आमदारांना लोकसभेची उमेदवारी मिळाली होती व ते निवडणूक हरले होते, त्यांच्या विधानसभा तिकिटावर प्रश्नचिन्ह होते. मात्र भाजपने मुनगंटीवार व कोटेचा यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे.
जरांगे रिंगणात
जालना : निवडणुकीचे समीकरण जुळविण्यावर लक्ष ठेवून उमेदवार उभे करायचे की पाडण्यासाठी काम करायचे, याबाबतची त्रिसूत्री मनोज जरांगे यांनी रविवारी जाहीर केली. मराठा जातीची शक्ती असेल तेथे स्वतंत्रपणे लढणे, आरक्षित मतदारसंघात पाठिंबा देणाऱ्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहणे आणि काही उमेदवार पाडण्याची रणनीती ठरविण्यात आली आहे.
उमेदवारी अर्ज भरून ठेवण्याची सूचना त्यांनी इच्छुकांना केली. कोणते अर्ज परत घ्यायचे ते २९ ऑक्टोबरला सांगू. जसे-जसे समीकरण जुळेल तस-तशा सूचना आपण देणार आहोत. निवडून येण्याची क्षमता आहे त्या मतदारसंघांत उमेदवार उभे करू, असे जरांगे यांनी स्पष्ट केले.