मुंबई : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’ला अखेर भाजपने मुंबईत एकही जागा न सोडता बोळवण केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसनेने एक जागा सोडली पण, त्या जागेवरचा उमेदवार शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ चिन्हावर निवडणूक लढणार असल्याने ‘रिपाइं’ची कोंडी झाली आहे.

आठवले यांनी मुंबईत १७ जागांची मागणी केली होती. मात्र, शेवटच्या दिवसांपर्यंत यावर काही तोडगा निघाला नाही. अखेर आठवले यांच्या ३९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आठवले यांच्याशी चर्चा केली. भाजपा आणि शिवसेना यांनी प्रत्येकी ६ जागा ‘रिपाइं’ला देण्याचे मान्य केले. या जागांवरचे त्या दोन्ही पक्षाचे उमेदवार अर्ज माघारी घेतील असा निर्णय झाला.

मात्र संबंधित उमेदवारांनी अर्ज मागे घेतले नाहीत. ‘रिपाइं’च्या २६ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. मात्र अजूनही ‘रिपाइं’चे मुंबईत १३ उमेदवार रिंगणात आहेत. हे स्वबळावर व महायुतीशी मैत्रीपूर्ण लढती करणार आहेत. शिंदे यांच्या शिवसेनेने आठवले यांच्यासाठी एक जागा सोडली आहे. मात्र त्या जागेवरचा उमेदवार शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर लढणार आहे.

मुंबईत ‘रिपाइं’ला ठेंगा दाखवला असला तरी उल्हासनगर मध्ये शिवसेनेने ९, पुणे मध्ये भाजपाने ९, पनवेलमध्ये १, छत्रपती संभाजी नगरमध्ये १ अशा संपूर्ण राज्यात केवळ २० जागा दिल्या आहेत. २०१७ मध्ये मुंबईत भाजपाने ‘रिपाइं’ला १७ जागा सोडल्या होत्या. तर २०१२ च्या निवडणुकीत २४ जागा दिल्या होत्या. महायुतीच्या जागा न सोडण्याने ‘रिपाइं’ कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी आहे. परंतु रिपाइं कार्यकर्ते टीकवून ठेवण्यासाठी दोन विधान परिषद सदस्य आणि महामंडळाची ६० सदस्य पदे ‘रिपाइं’ला लवकरच दिली जातील, असे गाजर महायुतीकडून दाखवले जात आहे.

कार्यकर्ते संभ्रमात :

महायुतीला प्रचारात बरोबर निळा झेंडा आणि रामदास आठवले यांची कायम गरज आहे. मुंबईच्या प्रत्येक मतदारसंघात आठवले यांना प्रचारासाठी मागणी आहे. आता आठवले हे महायुती उमेदवाराचा प्रचार करणार की आपल्या १३ उमेदवारांचा करणार, असा सवाल पदाधिकारी पक्षात विचारत आहेत. दुसरीकडे ‘वंचित बहुजन आघाडी’ काँग्रेसबरोबर तब्बल ४५ जागा लढवत आहे. यामुळे ‘रिपाइं’ची मोठी गोची झाली असून ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे राजकारण पुढे गेलेे आहे.