मुंबई : तमिळनाडू आणि केरळ या दोन्ही राज्यांमध्ये भाजपच्या पदरी निराशा आल्याने दक्षिण भारतात पक्ष वाढविण्याच्या प्रयत्नांना पुन्हा खीळ बसली आहे. तमिळनाडूत गेल्या वेळी चार जागा जिंकलेल्या भाजपला यंदा केवळ एकाच जागेवर विजय मिळाला आहे. तमिळनाडूत पक्ष वाढविण्यासाठी भाजपने अनेक प्रयत्न केले. तरीही पक्षाच्या पदरी निराशा आली आहे.
गेल्या वेळी अण्णा द्रमुकबरोबरील युतीत भाजपचे चार आमदार निवडून आले होते. यंदा चारही जागा भाजपने गमाविल्या आहेत. भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा वानथी श्रीनिवासन, केंद्रीय मंत्री मुरुगन, तेलंगणाच्या माजी राज्यपाल तामिळसाई सौंदरराजन यांचा पराभव झाला आहे.
तमिळनाडूत पक्ष वाढविण्यासाठी भाजपने अनेक प्रयोग केले. लोकसभेच्या नवीन सभागृहात चोला संस्कृतीचे प्रतिक असलेला राजदंड बसविण्यात आला. संसद भवनाच्या उद्घाटन समारंभात तमिळ संस्कृतीचा पगडा होता. वाराणसीत तमिळ संगमचे आयोजन करण्यात येते. पण त्याचा फारसा फरक पडलेला दिसत नाही.भाजप पुढे आल्यास राज्यात दिल्लीच्या इशार्यावर सारे निर्णय होतील व हिंदी सक्ती केली जाईल या द्रमुकच्या प्रचाराचा लोकांवर परिणाम झाला असणार. भाजपला याचा मोठा फटका बसला.
भाजपची परीक्षा
- केरळमध्येही भाजपच्या अपेक्षा वाढल्या होत्या. विशेषत: थिरूअंनतपुरम महापालिका निवडणुकीतील यशानंतर भाजपला चांगल्या यशाची अपेक्षा होती. भाजपचे तीनच उमेदवार निवडून आले आहेत. याचाच अर्थ केरळ आणि तमिळनाडू ही दोनही राज्ये भाजपला अजूनही अनुकूल नाहीत.
- दक्षिणेत कर्नाटक आणि तेलंगणा या दोन राज्यांमध्ये भाजपची चांगली ताकद आहे. कर्नाटकात दोनदा भाजपने सत्ता उपभोगली. तेलंगणात लोकसभा निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळाले होते. आंध्र प्रदेशात भाजप सत्तेत भागीदार असला तरी पक्षाची ताकद मर्यादित आहे.
- पुद्दुचेरीत भाजपचे चार आमदार निवडून आले असले तरी आर. एन. काँग्रेसबरोबर युतीत हे यश मिळाले. यामुळेच दक्षिणेकडे कर्नाटक व काही प्रमाणात तेलंगणाचा अपवाद वगळता भाजपला फार काही यश प्राप्त झालेले नाही.
काँग्रेस दक्षिणेचा पक्ष
केरळातील विजयाने काँग्रेसला कर्नाटक, तेलंगणानंतर केरळ या दक्षिणेतील तिसर्या राज्यात सत्ता मिळाली आहे. उत्तरेत हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसची सत्ता असली तरी ते छोटे राज्य आहे. हिंदी पट्ट्यात काँग्रेसची पाटी कोरी आहे. उत्तर, पश्चिम, ईशान्येकडील राज्यांमध्ये काँग्रेस कुठेच मोठ्या राज्यांमध्ये सत्तेत नाही. काँग्रेसला हिंदी भाषक पट्ट्यात अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे.
डावे पक्ष सत्तेबाहेर
१९७७ पासून पश्चिम बंगाल, केरळ, त्रिपूरा या राज्यांमध्ये सत्ता उपभोगलेल्या डाव्या आघाडीची आता कोणत्याच राज्यात सत्ता राहिलेली नाही. केरळमधील पराभवाने डाव्यांची सत्ता असलेले शेवटच्या राज्यातील सत्ता गमावली आहे. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा टिकविण्याचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षापुढे आव्हान असेल.
