मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीत महायुतीने मुंबईत १५० हून अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य निश्चित केले असून सहकारी पक्षांशी जागावाटपाची बोलणी यथावकाश सुरु होतील, असे मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी ‘ लोकसत्ता ’ ला सांगितले.

भाजपसाठी मुंबई महापालिका निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची असून काहीही करुन उद्धव ठाकरे यांना सत्तेवरुन खेचायचे, असे भाजपने ठरविले आहे. भाजपने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांची प्रभारीपदी नियुक्ती केली आहे.

शेलार हे याआधी तीनवेळा मुंबई भाजपचे अध्यक्ष होते. त्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मुंबईसह कोकणातील जबाबदारीही सांभाळली होती. त्याचबरोबर २०१७ मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत स्वबळावर लढताना भाजपला शिवसेनेपेक्षा केवळ दोन कमी म्हणजे ८२ जागा जिंकून दाखविल्या होत्या. त्यावेळी अतिशय अटीतटीची लढत झाली होती.

यावेळची निवडणूकही चुरशीची होणार असल्याने भाजपने जोरदार तयारी सुरु केली असून वरिष्ठ नेत्यांच्या नियोजनाच्या बैठका सुरु आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मुंबईत मेट्रो, अटल सेतू, बुलेट ट्रेन, यासह अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प साकारले आहेत आणि बीडीडी चाळींचा पुनर्विकास, झोपडपट्टीवासियांना घरे, धारावीचा पुनर्विकास यासह अनेक रखडलेले प्रकल्प मार्गी लावले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे निर्णय आणि राज्य सरकारच्या कामगिरीमुळे महायुतीला १५० हून अधिक जागा मिळतील, असा विश्वास असल्याचे साटम यांनी सांगितले.

महाविकास आघाडीला फारसे यश मिळण्याची शक्यता नसून कोणत्याही ‘ खान ’ ला मुंबईचा महापौर होवू देणार नाही आणि मुंबईचा रंग हिरवा करण्याचे राजकारण यशस्वी होवू देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

भाजपने महायुतीसाठी १५० हून अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य निश्चित केले असले तरी शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँगेसशी (अजित पवार) जागावाटपाची बोलणी सुरु झालेली नाहीत. राज्यातील बहुतांश महापालिका, जिल्हा परिषदा व नगरपालिकांमध्ये महायुतीतील पक्षांमध्ये जागावाटप होवू शकलेले नाही. वरिष्ठ नेत्यांमधील भांडणे आणि स्थानिक पातळीवरील वाद यामुळे बहुतांश ठिकाणी तीनही पक्ष स्वबळावर लढण्याची शक्यता आहे. मुंबईत मात्र भाजप व शिवसेनेलाही (एकनाथ शिंदे) एकत्र लढण्याची गरज वाटत आहे. त्यामुळे मुंबईत युती होण्याची शक्यता वरिष्ठ नेत्यांनी वर्तविली आहे.

महायुतीने १५० हून अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य निश्चित केले असून भाजपला १०० जागांचा टप्पा गाठायचा आहे. त्यामुळे भाजप हाच मुंबईत पहिल्या क्रमांकाचा पक्ष असेल, असा वरिष्ठ नेत्यांचा विश्वास आहे.