मुंबई – मुंबई महापालिकेच्या महापौर निवडीच्या प्रक्रियेला आता लवकरच सुरुवात होणार असून येत्या सोमवारी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेना (शिंदे) या दोन पक्षांचे नगरसेवक गटनोंदणीसाठी जाणार आहेत. हे दोन्ही पक्ष संयुक्त गटनोंदणी करणार असल्याचे निश्चित झाले आहे. महापालिका मुख्यालयात एकत्र जमून पुढे दोन्ही पक्षांचे नगरसेवक कोकण भवनला जाणार आहेत.

मुंबई महापालिका निवडणूकीसाठी १५ जानेवारीला मतदान पार पडले व १६ जानेवारीला मतमोजणीही झाली. या निवडणूकीत भाजपला सर्वाधिक ८९ जागा मिळाल्या. तर त्यांचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेना (शिंदे) पक्षाला २९ जागा मिळाल्या. शिवसेना (ठाकरे)पक्षाला ६५ जागा तर मनसेला सहा जागा मिळाल्या.

निवडणूकीचा निकाल लागून पंधरा दिवस उलटून गेले असून या काळात शिवसेना (ठाकरे), मनसे, कॉंग्रेस, एमआयएम या पक्षांनी कोकण भवन आयुक्तांकडे जाऊनआपली गटनोंदणीही केली. मात्र स्पष्ट बहुमत मिळालेल्या भाजप आणि शिवसेना (शिंदे) या पक्षांनी अद्याप आपली गटनोंदणी केलेली नाही. स्वतंत्र गटनोंदणी करायची की संयुक्त याबाबतचा निर्णय होत नसल्यामुळे ही गटनोंदणी रखडली होती. त्यातच गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे शासकीय दुखवटा जाहीर झाल्यामुळे ही गटनोंदणी होऊ शकली नाही.

दरम्यान, आता या दोन्ही पक्षात संयुक्त गटनोंदणी करण्याचा निर्णय झाला आहे. संयुक्त गटनोंदणी गटाचे संख्याबळ वाढेल व त्यामुळे वैधानिक समित्यांवर एक सदस्य संख्या वाढेल. याचा परिणाम असा होईल की वैधानिक समित्यांमध्ये महत्त्वाच्या प्रस्तावांवर मतदान घेताना महायुतीकडे स्पष्ट बहुमत असेल. त्यामुळे विरोधकांवर मात करता येईल अशी रणनीती असल्यामुळे संयुक्त गटनोंदणी करीता भाजपचा आग्रह होता.

मात्र संयुक्त गटनोंदणी केल्यास पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व राहणार नाही अशा भीतीमुळे शिवसेना (शिंदे) पक्षाची तयारी नव्हती. मात्र आता याबाबत एकमत झाले असून सोमवारी ही संयुक्त गटनोंदणी होणार आहे. पालिका मुख्यालयातील पक्ष कार्यालयात एकत्र जमून तिथून गटनोंदणीसाठी कोकण भवन विभागीय आयुक्तांकडे जाणार असल्याचे काही नगरसेवकांनी सांगितले.

गटनेता आणि प्रतोदचे सूत्र ठरले

संयुक्त गटनोंदणी करताना गटनेता आणि प्रतोदचे सूत्र ठरले असल्याचे समजते. यामध्ये गटनेता एकच असेल व तो भाजपचा असेल असे निश्चित झाले आहे. मात्र प्रतोद हा शिवसेना (शिंदे) पक्षाचा असेल. त्यामुळे भाजपकडे बहुमत असले तरी व्हीप काढण्याचा अधिकार शिवसेना (शिंदे) पक्षाकडे असेल.