scorecardresearch

भाजप-शिवसेनेच्या आशीर्वाद यात्रांना आज सुरुवात, शिंदे-फडणवीस यांचा सहभाग

तर दुसरी यात्रा ईशान्य लोकसभा मतदारसंघात अमृतनगरपासून मुलुंड (प.) पर्यंत सकाळी १० वाजता काढण्यात येणार आहे. 

shinde fadanvis
प्रतिनिधिक छायाचित्र/लोकसत्ता

मुंबई : भाजप-शिवसेनेच्या आशीर्वाद यात्रांना मुंबईत रविवारपासून सुरुवात होत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजप अध्यक्ष अ‍ॅड. आशीष शेलार यांच्यासह मंत्री, खासदार, आमदार व दोन्ही पक्षांचे नेते त्यात सहभागी होणार आहेत.

मुख्यमंत्री शिंदे गटाला निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिल्यावर जनजागृती करण्यासाठी आणि उद्धव ठाकरे गटाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजप-शिवसेनेकडून सहाही लोकसभा मतदारसंघांत दुचाकी फेरीच्या माध्यमातून आशीर्वाद यात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातील जांबोरी मैदानापासून आशीर्वाद यात्रेची सायंकाळी पाच वाजता सुरुवात होणार आहे आणि रात्री नऊ वाजता मुंबादेवी येथे समारोप होणार आहे.

तर दुसरी यात्रा ईशान्य लोकसभा मतदारसंघात अमृतनगरपासून मुलुंड (प.) पर्यंत सकाळी १० वाजता काढण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरेंसह त्यांच्या गटातील नेत्यांनी जोरदार टीकेची झोड उठविली आहे. त्यास भाजप व शिंदे गटाकडून प्रत्युत्तर दिले जाणार आहे. भाजप आणि शिवसेनेकडून रविवारी आणि ९ व ११ मार्च रोजी प्रत्येकी दोन लोकसभा मतदारसंघांत आशीर्वाद यात्रा काढल्या जाणार असल्याचे शेलार यांनी सांगितले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-03-2023 at 00:52 IST
ताज्या बातम्या