मुंबई : माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातील जांबोरी मैदानात दहीहंडी उत्सवाचे आयोजन करून भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी शिवसेनेला धक्का दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना सचिन अहिर गेली अनेक वर्षे वरळीतील जांबोरी मैदानात दहीहंडी उत्सवाचे आयोजन करीत होते. मात्र न्यायालयाने १४ वर्षांखालील मुलांना दहीहंडीच्या थरामध्ये मज्जाव केल्यानंतर सचिन अहिर यांनी हा उत्सव बंद केला. विधानसभेच्या मागील निवडणुकीत युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली. निवडणुकीत विजयी झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी वरळी परिसरात विकासकामांचा धडाका लावला होता. वरळी परिसरातील माजी आमदार सुनील शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत दाखल झालेले सचिन अहिर यांची आमदार म्हणून विधान परिषदेवर वर्णी लागली. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले खासदार अरविंद सावंत यांनी केंद्रीय मंत्रीपद भूषविले होते. त्यामुळे या परिसराला शिवसेनेचा एक खासदार, तीन आमदार लाभले आहेत. माजी महापौर किशोरी पेडणेकर याच परिसरातील प्रभागातून विजयी झाल्या होत्या. तसेच याच परिसरातील माजी नगरसेवक आशीष चेंबूरकर यांच्या पदरात बेस्ट समितीचे अध्यक्षपद पडले होते. शिवसेनेची ही मातब्बर मंडळी असतानाही दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने भाजपने वरळी परिसरात मुसंडी मारली आहे.

जांबोरी मैदान आरक्षित झाले नसल्याचे हेरून भाजपने १०-१२ दिवसांपूर्वी ते आरक्षित केले. मुंबई भाजप अध्यक्षपदी अ‍ॅड. आशीष शेलार यांची नियुक्ती नुकतीच झाली असून त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघावर विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांनी आधीच भाजप पदाधिकारी संतोष पांडे यांना सूचना देऊन मैदानाचे आरक्षण करून दहीहंडीचे आयोजन केले. आम्ही मुंबई महानगरपालिका, पोलीस आणि अन्य सर्व परवानग्या मिळविल्या आहेत, असे पांडे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

अहिर यांची दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकास लाखो रुपयांची बक्षिसे देण्यात येत होती. भाजप दहीहंडीसाठी किती लाखांची पारितोषिके देणार हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. महापालिकेतील भ्रष्टाचारमुक्तीची ही दहीहंडी असल्याने आम्ही बक्षिसाची रक्कम अद्याप ठरविलेली नाही, मात्र ती फोडणाऱ्या गोविंदांचा यथोचित सन्मान केला जाईल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह वरिष्ठ भाजप नेते या दहीहंडीसाठी येणार असल्याची माहिती पांडे यांनी दिली.

भाजपतर्फे मुंबईत ३५० दहीहंडय़ा

भाजपने यंदा मुंबईत ३५० हून अधिक दहीहंडय़ांचे आयोजन केले असून मुंबई भाजपने २२७ हून अधिक गोविंदा पथकांचा अपघात विमा उतरविला आहे. याखेरीज मुंबईतील भाजप नेत्यांनी वैयक्तिक पातळीवरही मोठय़ा प्रमाणावर दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले असल्याचे मुंबई भाजप अध्यक्ष अ‍ॅड. आशीष शेलार यांनी सांगितले.