मुंबई: राज्यात आणि केंद्रात जशी आघाडी, युती असते तशीच आघाडी मुंबई महापालिकेतही तयार करण्याचा भाजपा -शिवसेना (शिंदे) पक्षाचा विचार आहे. यामध्ये राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या तीन नगरसेवकांचाही समावेश करून ही तीन पक्षांची युती केली जाणार आहे. पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व राहावे यासाठी शिवसेना (शिंदे) पक्षाने स्वतंत्र गटनोंदणी केलेली असली तरी आघाडी स्थापन झाल्यास भाजपचे गटनेते हेच सभागृहनेता होतील व भाजपचाच पक्षादेश शिवसेना (शिंदे) पक्षाला मानावा लागेल अशी चर्चा आहे.
मुंबई महापालिकेची निवडणूक पार पडून निकाल लागलेला असला तरी आता मुंबई महापालिकेवर महापौर निवडीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. श्रीमंत महानगरपालिका अशी ख्याती असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदाची निवडणूक लवकरच अपेक्षित आहे. भाजप आणि शिवसेना (शिंदे) पक्षाला स्पष्ट बहुमत असले तरी या दोन पक्षांमध्येच वर्चस्वाची लढाई गेल्या काही दिवसांपासून बघायला मिळत आहे. त्यातूनच स्वतंत्र गटनोंदणी करायची की संयुक्त गटनोंदणी करायची यावर गटनोंदणीचे घोडे अडकले होते. वैधानिक समित्यांमध्ये सत्ताधारी नगरसेवक आणि विरोधी बाकांवरील नगरसेवकांची संख्या समान आहे.
त्यामुळे वैधानिक समित्यांमधील वर्चस्व वाढवण्यासाठी संयुक्त गटनोंदणी करण्याचा भाजपचा आग्रह होता. मात्र संयुक्त नोंदणी केल्यास पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व राहणार नाही याची शिवसेना (शिंदे) पक्षाच्या नगरसेवकांना भीती आहे. त्यामुळे स्वतंत्र गटनेते पद मिळणार नाही तसेच पक्ष कार्यालयही मिळणार नाही. त्यामुळे शिवसेना (शिंदे) पक्षाचा स्वतंत्र नोंदणीचा आग्रह होता. त्यानुसार सोमवारी दोन्ही पक्षांनी स्वतंत्र नोंदणी केली. तसेच वैधानिक समित्यांमध्ये संख्याबळ वाढवण्यासाठी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या तीन नगरसेवकांनाही शिवसेना (शिंदे) पक्षात समाविष्ट करण्यात येणार होते. मात्र राष्ट्रवादीच्या तीन नगरसेवकांची नोंदणी सोमवारी होऊ शकली नाही. परंतु, राष्ट्रवादीचे तीन नगरसेवकही आपली स्वतंत्र गटनोंदणी करणार असल्याचे समजते.
तीन पक्षांनी स्वतंत्र गटनोंदणी केल्यानंतर काही दिवसातच एकत्र आघाडी तयार करणार असून त्याचे नावही मुंबई विकास आघाडी असे निश्चित करण्यात आले आहे. सभागृहात किंवा वैधानिक समित्यांमध्ये आघाडी म्हणून निर्णय घेतले जाणार असल्यामुळे समित्यांमध्ये येणारे प्रस्ताव या आघाडीच्या जोरावर मंजूर केले जाणार आहेत. मात्र या आघाडीवर भाजपचेच प्रभुत्व असेल अशी शक्यता अधिक आहे. भाजपने गटनेतेपदी गणेश खणकर यांची निवड केली असून त्यांनाच सभागृहनेतेपदी नियुक्त केले जाणार आहे. त्यामुळे भाजपच्या व्हीपनुसारच शिवसेना (शिंदे) पक्षाला प्रस्तावावर निर्णय घ्यावे लागणार आहेत.
याबाबत भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष अमित साटम यांनी युतीची शक्यता फेटाळून लावली असून संख्याबळाचे गणित जुळून आलेले आहे. त्यामुळे अशा युतीची आता आवश्यकता नाही, अशी प्रतिक्रिया दिली.
तर शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते माजी खासदार राहुल शेवाळे यांनी सांगितले की, गटनोंदणीची प्रक्रिया संध्याकाळी उशीरापर्यंत होणार असून कदाचित उद्यापर्यंत ही प्रक्रिया चालू शकते. त्यामुळे त्यानंतर महापालिकेच्या चिटणीस विभागाशी चर्चा करून याबाबतचा निर्णय घेतला जाईल.

