शिवसेना ज्या ठिकाणी इतकी वर्षे सत्तेत आहे त्या मुंबईत महानगरपालिकेत होणाऱ्या भ्रष्टाचाराविरुद्ध पोलसभेचं ठिकठिकाणी भाजपाने आयोजन केलं आहे. या पोलखोल सभेच्या माध्यमातून पालिकेतील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला जात आहे. यामुळे महापालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेना आणि विरोधात असलेल्या भाजपा यांच्यात चांगलीच जुंपली आहे. ठिकठिकाणी भाजपा शिवसेना कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकल्याचं पाहायला मिळत आहे.

आता दहिसरमध्ये शिवसेना आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये या सभेवरून वादाची ठिगणी पडली आहे. शिवसेना नगरसेविका शितल म्हात्रे यांनी आक्रमकपणे आपल्या प्रभागात पोलखोल अभियानासाठी बांधलेल्या स्टेजवर आक्षेप घेतला आहे. तसेच हा स्टेज अनधिकृतपणे बांधल्याचा आरोप आपल्या फेसबुक लाईव्हमध्ये करत आहे. यावेळी शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमकपणे स्टेज बाजूला करताना दिसत आहेत. तर भाजपा नगरसेवक जगदीश ओझा आणि इतर भाजपा पदाधिकारी याला विरोध करताना दिसत आहेत. त्यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवसेना नगरसेविका शितल म्हात्रे यांनी आपल्या फेसबुक लाईव्ह पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “दहिसर प्रभाग क्रमांक ७ येथील नवागाव परिसरात भारतीय जनता पक्षाच्या पोलखोल या कार्यक्रमाच्या सभेची अनधिकृतपणे तयारी सुरु होती. या ठिकाणी जाऊन परवानागी दाखविण्यास सांगितली असता त्याला न जुमानता भाजपा कडून तयारी सुरु होती. या गोष्टींना आळा घालण्यासाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांसह पोलीस आणि महापालिकेच्या सहाय्याने त्यांचा सभामंच आणि इतर तयारीवर कारवाई केली. बाळासाहेबांच्या मुंबापुरीत भाजपाची अशी अनधिकृत दादागिरी खापवून घेतली जाणार नाही.”

याआधी अज्ञातांनी चेंबूरमध्ये भाजपाच्या पोलखोल रथाची तोडफोड केली होती. तसेच कांदवली, गोरेगावमधील पत्राचाळीसमोरील कार्यक्रमाला शिवसेना कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला होता.