मुंबई – मुंबई महापालिकेच्या महापौर निवडीच्या प्रक्रियेला आता लवकरच सुरुवात होणार असून सोमवारी महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) या तिन्ही पक्षांचे नगरसेवक महापालिका मुख्यालयात एकत्र आले. भाजप आणि शिवसेना (शिंदे) पक्षाने आपल्या दोन स्वतंत्र गटाची नोंदणी करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपच्या गटनेते पदी गणेश खणकर यांना नियुक्त करण्यात आले आहे.
मुंबई महापालिका निवडणूकीसाठी १५ जानेवारीला मतदान पार पडले व १६ जानेवारीला मतमोजणीही झाली. या निवडणूकीत भाजपला सर्वाधिक ८९ जागा मिळाल्या. तर त्यांचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेना (शिंदे) पक्षाला २९ जागा मिळाल्या. शिवसेना (ठाकरे)पक्षाला ६५ जागा तर मनसेला सहा जागा मिळाल्या.
निवडणूकीचा निकाल लागून पंधरा दिवस उलटून गेले असून या काळात शिवसेना (ठाकरे), मनसे, कॉंग्रेस, एमआयएम या पक्षांनी कोकण भवन आयुक्तांकडे जाऊन आपली गटनोंदणीही केली. मात्र स्पष्ट बहुमत मिळालेल्या भाजप आणि शिवसेना (शिंदे) या पक्षांनी अद्याप आपली गटनोंदणी केलेली नव्हती. स्वतंत्र गटनोंदणी करायची की संयुक्त याबाबतचा निर्णय होत नसल्यामुळे ही गटनोंदणी रखडली होती. त्यातच गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे शासकीय दुखवटा जाहीर झाल्यामुळे ही गटनोंदणी होऊ शकली नाही.
राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे नगरसेवक शिवसेना (शिंदे) सोबत…… मुंबई महापालिकेच्या निवडणूकीत स्पष्ट बहुमत असलेल्या भाजप-शिवसेना(शिंदे) महायुतीची गटनोंदणी अखेर आज सोमवारी होणार आहे. या गटनोंदणीपुर्वी दोन्ही पक्षांचे नगरसेवक सोमवारी सकाळी पालिका मुख्यालयात जमले होते.
भाजप – शिवसेना (शिंदे) पक्षाची संयुक्त नोंदणी होणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. मात्र या दोन पक्षांंनी स्वतःचे स्वतंत्र गट स्थापन केले असून गटनेतेही निवडले आहेत. तर राष्ट्रवादी (अजित पवार)गटाचे तीन नगरसेवक असून या तिघांनी शिवसेना (शिंदे) पक्षासोबत गटनोंदणी करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे शिवसेना (शिंदे) पक्षाच्या गटाचे २९ अधिक ३ असे ३२ नगरसेवक सभागृहात असतील. महायुतीतील घटकपक्षांनी सोमवारी पालिका मुख्यालयात याबाबतचे ठराव केले. यावेळी मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम, मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित होते.
गणेश खणकर गटनेतेपदी … भाजपच्या गटनेतेपदी दहिसरमधून निवडून आलेले गणेश खणकर यांची निवड करण्यात आली आहे. गणेश खणकर हे भाजपाचे मुंबईचे महामंत्री आहेत. खणकर यांनी आतापर्यंत सर्व निवडणूकांंमध्ये भाजपच्या उमेदवारांचे अर्ज भरण्यापासून ते प्रचार यंत्रणा उभी करण्यापर्यंत काम केले आहे. विविध राज्यांमध्ये जाऊन त्यांनी निवडणूकीचे काम केले आहे. त्यांनी दहिसरमध्ये शिवसेना (ठाकरे) पक्षाचे उमेदवार सौरभ विनोद घोसाळकर यांचा पराभव केला होता.

