मुंबई : सार्वजनिक रस्त्यांवर फटाके न फोडण्याबाबत जनजागृती करणाऱ्या अभिनेत्री दिया मिर्झाच्या ध्वनीचित्रफितीवर आक्षेप घेणाऱ्या भाजपच्या नेत्यांना मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी जोरदार चपराक दिली. भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे, असे उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा बजावले आहे. त्यामुळे भाजपने दिया मिर्झाची माफी मागावी आणि मुंबई महापालिका आयुक्तांनी मिर्झाची ध्वनीचित्रफीत हटवण्याचे कारण स्पष्ट करावे, अशी मागणी समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी केली आहे.

मुंबईतील वाढत्या प्रदूषणासंदर्भातील जनजागृतीच्या संदेशाला भाजपने धार्मिक रंग दिला. दिया मिर्झा ही हिंदूविरोधी असल्याचे खोटे कथानक भाजपच्या नेत्यांनी पसरवले. तसेच मुंबई महापालिकेवर दबाव आणून दिया मिर्झाची ती ध्वनीचित्रफीत हटवण्यास भाग पाडले. भाजपचे हे धार्मिक द्वेष पसरवणारे राजकारण आहे. विशिष्ट धर्मीयांना भाजपकडून जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे, असे आमदार रईस शेख म्हणाले.

पर्यावरणपूरक दिवाळीसंदर्भात जनजागृतीचा संदेश देणाऱ्या अभिनेत्री दिया मिर्झाविरोधात द्वेषमूलक विधाने करणारे भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि अंधेरी पश्चिमचे आमदार अमित साटम यांनी दिया मिर्झाची माफी मागितली पाहिजे. तसेच मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिया मिर्झाची ध्वनीचित्रफीत का हटवली, याचा खुलासा केला पाहिजे. दिया मिर्झाची ती ध्वनीचित्रफीत मुंबई महापालिकेने आपल्या संकेतस्थळावर अपलोड करावी, अशी मागणी आमदार रईस शेख यांनी केली आहे.

आमदार रईस शेख यांचे आयुक्तांना सहा प्रश्न :

१. अभिनेत्री दिया मिर्झाची ध्वनीचित्रफीत नेमक्या कोणत्या कारणास्तव आणि कोणाच्या निर्देशानुसार समाजमाध्यमांवरून हटवण्यात आली?

२. मुंबई उच्च न्यायालयाच्या ज्या निर्देशांचा संदर्भ महापालिकेने दिला आहे, त्यांची प्रत उपलब्ध करून द्यावी. तसेच या प्रकरणात उच्च न्यायालयाचा नेमका काय संबंध आहे, हे महापालिकेने स्पष्ट करावे.

३. प्रदूषणासंदर्भातील जनजागृती मोहिमेत सहभागी झालेल्या वलयांकित व्यक्तींची निवड कोणत्या निकषांवर करण्यात आली? त्यासाठी कोणती प्रशासकीय प्रक्रिया राबवण्यात आली?

४. या मोहिमेसाठी वलयांकित व्यक्तींना मानधन अथवा अन्य मोबदला देण्यात आला आहे का? असल्यास, प्रत्येकाला देण्यात आलेल्या रकमेचा तपशील द्यावा.

५. या मोहिमेसाठी किती खर्च करण्यात आला? जाहिरात, प्रसिद्धी, ध्वनीचित्रफीत निर्मिती, मानधन आणि अन्य बाबींवरील खर्चाचा तपशील द्यावा.

६. दिया मिर्झाची ध्वनीचित्रफीत हटवण्याचा निर्णय घेताना अन्य वलयांकित व्यक्तींच्या ध्वनीचित्रफितींसंदर्भात कोणते निकष लावण्यात आले? असल्यास, त्याचे स्पष्टीकरण द्यावे