scorecardresearch

सोमय्या पिता-पुत्रांना आर्थिक गुन्हे शाखेचे समन्स

भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांना आर्थिक गुन्हे शाखेने समन्स बजावले असून १३ एप्रिलला तपासासाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहे.

Police notice to Kirit Somaiya

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांना आर्थिक गुन्हे शाखेने समन्स बजावले असून १३ एप्रिलला तपासासाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहे. आय.एन.एस. विक्रांत युद्धनौका वाचविण्याच्या नावाखाली ५७ कोटींचा निधी जमा करून राज्यपाल कार्यालयात ही रक्कम जमा न करता तिचा अपहार केल्याप्रकरणी हा समन्स बजावण्यात आला आहे. नुकतेच हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेला वर्ग करण्यात आले होते. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने मंगळवारी शोध मोहीम राबवली.

आय.एन.एस. विक्रांत युद्धनौका वाचविण्याच्या नावाखाली ५७ कोटींचा निधी जमा करून राज्यपाल कार्यालयात ही रक्कम जमा न करता तिचा अपहार केल्याच्या आरोपाखाली किरीट सोमय्या व नील सोमय्या यांच्याविरोधात ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. माजी सैनिक बबन भोसले यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल गुह्यातील रक्कम १० कोटींपेक्षा जास्त असल्याने हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने याप्रकरणी दोघांनाही समन्स बजावले आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे एक पथक सोमय्या यांच्या घरी गेले होते. दरम्यान, बुधवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात सोमय्या यांचे वकील उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

 यापूर्वी ट्रॉम्बे पोलिसांनीही किरीट सोमय्या व त्यांचे पुत्र नील यांना समन्स बजावले होते. परंतु अटकपूर्व जामिनासाठी त्यांनी न्यायालयात अर्ज केल्यामुळे सोमय्या पिता-पुत्र चौकशीला उपस्थित राहणार नसल्याचे त्यांच्या वकिलांनी ट्रॉम्बे पोलिसांना कळवले होते. त्यानंतर सत्र न्यायालयाने दोघांचाही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.

उच्च न्यायालयात धाव

किरीट सोमय्या यांनी अटक टाळण्यासाठी मंगळवारी उच्च न्यायालयात धाव घेतली. सोमय्या यांचा मुलगा नील याचाही अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने मंगळवारी फेटाळला. आयएनएस ‘विक्रांत’ला भंगारात जाण्यापासून वाचवण्यासाठी सोमय्या यांनी निधी गोळा केल्याचे, परंतु ते राज्यपालांच्या कार्यालयात जमा केले नसल्याचे पुराव्यांतून स्पष्ट होते, असे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन सोमवारी फेटाळला होता. मात्र सत्र न्यायालयाचा आदेश चुकीचा असल्याचा दावा करत सोमय्या यांनी या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. गुरुवारपासून सलग आलेल्या सार्वजनिक सुट्टय़ांमुळे याचिका बुधवारीच सुनावणीसाठी यावी यासाठी किरीट यांच्यातर्फे प्रयत्न केले जात आहेत.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp somaiya father son summons economic crimes branch financial ysh

ताज्या बातम्या