सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठं नुकसान झालं आहे. हजारो कुटुंबांना फटका बसला असून घरासह व्यवसायाचं नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून पिकेही वाया गेली आहेत. काही ठिकाणी जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगलीतील भिलवडीला भेट दिली. दरम्यान, या संकटातून मार्ग काढणारचं, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी तत्कालीन फडणवीस सरकारवर टीका केली, “ते म्हणाले आतापर्यंतची आपली प्रथा आहे. संकट आल्याबरोबर हजारो कोटीचे पॅकेज जाहीर करतात. मात्र, ते पॅकेज कुठं जातं कुणालाचं माहीत नाही. मला असे थोतांड येत नाहीत. मी प्रमाणिकपणे मदत करणार आणि ती केल्याशिवाय राहणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.

यावर भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्र्यावर टीका केली आहे. “म्हणजे असं झालं की लोकांना मदत केली, पॅकेज घोषित केले की त्यातील पैशातून सरकारमधीलच वसुली होते याची प्रामाणिक कबुली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे का? पूरग्रस्तांसाठी मदत पॅकेजमध्येही कुणी वाझे आहे का? मुख्यमंत्र्यांचा रोख नेमका कुणाकडे आहे? सहज बोलले की ‘घड्याळा’ची वेळ चुकलीय? असा टोला उपाध्ये यांनी लगावला आहे.

हेही वाचा- या संकटातून मार्ग काढणारच; सांगलीत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला विश्वास

काय म्हणाले मुख्यमंत्री?

“सांगलीतील पुरपरिस्थिती मला माहिती आहे. डोक्यावरुन पाणी जात होतं, अनेकांच्या घरात पाणी गेलं तसेच संसार उघड्यावर आले. आर्थिक नुकसान देखील झाले आहे. शेतीचं देखील नुकसान झालं आहे. या संकटांची मालिका आपल्यावर कोसळली आहे. मात्र मला आत्मविश्वास आहे की मी मार्ग काढणारचं. तात्काळ मदतीबाबत मी अंदाज घेत आहे. किती घरे उध्वस्त झाले, किती मदत करावी लागेल. तसेच काही ठीकाणी कायमस्वरुपी मदत करावी लागेल. त्यासाठी तुमची तयारी हवी,” असे मुख्यमंत्री म्हणाले.

मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत चर्चा करणार

भिलवडीनंतर मुख्यमंत्र्यांनी अंकलखोपमधील ग्रानस्थांशी संवाद साधला. मुख्यमंत्री म्हणाले, “आपत्तीनंतर तुम्हाला पायावर उभं करायची जबाबदारी आमची आहे. ही अतीवृष्टी होण्याआधीपासूनच या संपूर्ण भागात कोरोनाचा संसर्ग खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. कृपा करून गर्दी करू नका. मास्क घालत राहा. पावसाळ्यानंतर येणारे आजार होणार नाहीत यासाठी प्रशासनास सूचना दिली आहे. मी सर्वांची निवेदने घेत आहे. सर्वांच्या सूचनांचा स्वीकार करणार आहे. मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत यावर चर्चा करू.पूर दरवर्षी येतोय, दरवर्षी मुख्यमंत्री, मंत्री येणार आणि चौकशी करून जाणार. असेच आयुष्य जगायचे का? अतिवृष्टीचा इशारा येताच प्रशासनाने या भागातील लोकांचे लगेच स्थलांतर केले, जीव जाऊ दिले नाहीत. हे आपलं सरकार आहे. तुमची सर्वांची ताकद आहे. तुमच्या हिताचेच निर्णय घेणार.”