मुंबई : राज्यातील भाजपच्या सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पक्षाची प्रदेश कार्यकारिणीची बैठक मंगळवारी मुंबईत होणार आहे. भ्रष्टाचार, गुन्हेगारीकरण आणि महाविकास आघाडी सरकारकडून झालेली जनतेची फसवणूक या महत्त्वाच्या विषयांबाबत बैठकीत पक्षाची भूमिका स्पष्ट के ली जाईल, असे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी रविवारी सांगितले.

 प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या एक दिवसाच्या कार्यकारिणी बैठकीचे उद्घाटन पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी व राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी करणार आहेत. कार्यकारिणी बैठकीत तीन ठराव मांडण्यात येतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा एक ठराव असेल. राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि त्याला राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून मिळणारे समर्थन याविषयी एक ठराव असेल. महाविकास आघाडी सरकारकडून समाजाच्या सर्वच घटकांची फसवणूक झाली असून त्याची चर्चा या राजकीय ठरावात करण्यात येईल. राज्यातील विरोधी पक्ष म्हणून भाजप प्रभावी कामगिरी करत आहे. पक्षाच्या आगामी वाटचालीची दिशा मान्यवरांच्या मार्गदर्शनातून आणि ठरावांद्वारे स्पष्ट होईल, असे उपाध्ये यांनी नमूद केले.