ओबीसी आरक्षणासाठी भाजपचे राज्यभरात आंदोलन

निवडणूक आयोगाने राज्यातील धुळे, नंदुरबार, वाशीम, अकोला, नागपूर येथील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पोटनिवडणुका जाहीर केल्या आहेत.

मंत्र्यांना फिरू न देण्याचा इशारा; नाना पटोलेंचे प्रत्युत्तर

मुंबई : राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण गेल्याची टीका करीत भाजपने बुधवारी राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलन करत महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच ओबीसी आरक्षणाचे मारेकरी असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष व खासदार डॉ. प्रीतम मुंडे, आमदार संजय कुटे, बाळासाहेब सानप, प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, आमदार अतुल सावे, गोपीचंद पडळकर, खासदार रामदास तडस, सुनील मेंढे यांच्यासह पक्षाचे अनेक लोकप्रतिनिधी व पदाधिकारी या आंदोलनांमध्ये सहभागी झाले होते. राज्य सरकारने तातडीने निर्णय घेऊन ओबीसी आरक्षण पूर्ववत न केल्यास आघाडी सरकारमधील मंत्र्यांना फिरू देणार नाही, असा इशारा या आंदोलनात देण्यात आला.

निवडणूक आयोगाने राज्यातील धुळे, नंदुरबार, वाशीम, अकोला, नागपूर येथील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पोटनिवडणुका जाहीर केल्या आहेत. या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार आहेत. राज्य सरकारने न्यायालयात वेळेत सांख्यिकी तपशील (इम्पिरिकल डेटा) सादर केला असता, तर ओबीसी समाजाचे आरक्षण कायम राहिले असते. परंतु महाविकास आघाडी सरकारच्या धोरणामुळे ओबीसी समाज राजकीय आरक्षणाला मुकला आहे, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली व लढा तीव्र करण्याचा इशारा दिला.

मोदी, फडणवीसच ओबीसी आरक्षणाचे मारेकरी -पटोले 

राज्यातील इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपचे आंदोलन म्हणजे नाटक आहे. मुळात ओबीसींच्या आरक्षणाचे केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार व राज्यातील तत्कालीन फडणवीस सरकार मारेकरी असल्याचा आरोप प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला. केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी न दिल्याने व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिपत्रक काढून जिल्हा परिषद निवडणुका पुढे ढकलल्याने फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशातील ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात आल्याची टीका पटोले यांनी केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या भाजपची विचारधाराच आरक्षण विरोधी असून ओबीसींचे राजकीय आरक्षण घालवून ओबीसी समाजाला सत्तेपासून वंचित ठेवण्याचा डाव आहे, असा आरोपही पटोले यांनी केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bjp statewide agitation for obc reservation akp

ताज्या बातम्या