scorecardresearch

उत्कृष्ट समाजकार्यासाठी मुनगंटीवार सन्मानित; गडकरींच्या हस्ते पुरस्कार मिळाल्यानंतर म्हणाले, “ते वक्तव्य मी…”

‘द सीएसआर जर्नल’तर्फे मुंबईत सत्कार

चंद्रपूरसह राज्यात राबविलेल्या विविध विकास कार्यांमुळे सामान्य, गरीब व गरजू नागरिकांना मोठा फायदा करून दिल्याबद्दल महाराष्ट्र विधिमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांना ‘द सीएसआर जर्नल’तर्फे समाजकार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मुनगंटीवार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘द सीएसआर जर्नल’चे अमित उपाध्याय, जगजितसिंह कोहली, योगेश शहा, दिलीपसिंह मेहता, राकेश मिश्रा, पवन सहगल, अनुराधा देवनानी आदी यावेळी उपस्थित होते.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना मुनगंटीवार म्हणाले, “कोणताही पुरस्कार मिळाल्यानंतर खांद्यांवरच्या जबाबदारीत वाढ होत असते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे राजकारणापेक्षा समाजकारण अधिक करीत असतात. त्यांच्यापासूनच मला प्रेरणा मिळते. सीएसआरच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यात विकास कामांचा वेग वाढविता आला. सीएसआर म्हणजे उद्योग-व्यवसाय क्षेत्रांकडुन सामान्यांसाठी पुढे येणारा मदतीचा हात आहे. सीएसआर निधीतून लोकांना अशी मदत करणारे हात म्हणजे संस्कृतीचे रक्षक आहेत”.

“केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यातील राजकारणात सक्रिय असताना अगरबत्तीबद्दल सहज एक वक्तव्य केले होते. हे आपण पूर्णपणे ध्यानात ठेवले. त्यातूनच चंद्रपुरात अगरबत्ती उद्योग उभारण्याचे काम हाती घेतले. रतन टाटा यांच्या सहकाऱ्याने चंद्रपुरात कर्करोग रुग्णालय उभारण्यासाठी मोलाची मदत झाली. सीएसआर निधीतूनच हे शक्य झाले,” असे मुनगंटीवार यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bjp sudhir mungantiwar felicitated in csr journal excellence awards 2021 sgy