scorecardresearch

“उद्धवजी, अजूनही काही बिघडलेलं नाही, पुन्हा एकदा…”, विधानपरिषदेत सुधीर मुनगंटीवारांची टोलेबाजी; सभागृहात पिकला हशा!

मुनगंटीवार म्हणतात, “उद्धवजी, मी अनेकदा तुम्हाला व्यक्तिगत भेटून सांगायचो की झाडाला फळं येतील. पण तुम्ही…!”

sudhir mungantiwar uddhav thackeray
सुधीर मुनगंटीवार यांची सभागृहात टोलेबाजी! (फोटो – विधानपरिषद कामकाजातून साभार)

भाजपा आणि शिवसेना यांची युती तुटली आणि २०१९ साली महाविकास आघाडीसारखा न भूतो न भविष्यती असा प्रयोग महाराष्ट्रात झाला. अडीच वर्षं हे सरकार सत्तेत राहिल्यानंतर शिवसेनेत बंडखोरी झाली आणि उद्धव ठाकरेंचं सरकार पडलं. या राजकीय घडामोडींचे संदर्भ महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सातत्याने येत असतात. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये गुरुवारी त्याचेच पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं. भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी समोर बसलेल्या उद्धव ठाकरेंना सूचक सल्ला देतात सभागृहात एकच हशा पिकला!

“शरद पवारही झाड लावायला आले होते”

विधानपरिषदेत बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी मागील सरकारच्या काळातील एका वृक्षारोपण योजनेविषयी बोलताना सांगितलं, “२०१६मध्ये या योजनेला सुरुवात केली, तेव्हा उद्घाटनाला राज्यातील सर्व प्रमुख पक्षांचे नेते आले होते. उद्धव ठाकरेही आले. शरद पवार स्वत: झाड लावायला गेले”, असं मुनगंटीवार म्हणाले. तेवढ्यात समोर बसलेल्या उद्धव ठाकरेंनी “पण झाडाला फळंच नाही आली त्या”, असा टोला लगावला.

“मी तर तुम्हाला व्यक्तिगत भेटून सांगायचो…”

दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या टोल्यावर लागलीच मुनगंटीवारांनी सूचक टिप्पणी केली. “उद्धवजी, मी अनेकदा तुम्हाला व्यक्तिगत भेटून सांगायचो की झाडाला फळं येतील. पण तुम्ही झाडाशीच नातं तोडलं. आता त्याला काय करणार. मी व्यक्तिगत तुम्हाला येऊन सांगायचो की उद्धवजी, या झाडाला कोणतं खत पाहिजे. तुम्ही ते खत न देता दुसरंच खत दिलं. त्याच्यामुळे त्या झाडाला फळं कशी येतील? मी एकदा नाही, तीनदा विनंती केली होती”, असं मुनगंटीवार म्हणाले.

संजय राऊतांना शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरून हटवलं, ‘या’ नेत्याचा दिल्लीत आवाज घुमणार

मुनगंटीवारांच्या या टिप्पणीवर उद्धव ठाकरेंनी निरमा पावडरचा उल्लेख करताच विरोधी बाकांवर हास्याची लकेर उमटली. “त्याच्याऐवजी निरमा पावडर टाकली तुम्ही”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“निरमा पाकिटात खत आलं होतं”

उद्धव ठाकरेंच्या खोचक टोल्यावर सुधीर मुनगंटीवारांनी प्रत्युत्तरादाखल उद्धव ठाकरेंना खोचक सल्ला दिला. “खतच होतं. पण ते निरमा पाकिटात आल्यामुळे तुमचा गैरसमज झाला. आणि तुम्ही ज्याच्यावर नाव दुसरं होतं आणि द्रव्य झाड जाळणारं होतं ते टाकलं. पण अजूनही काही बिघडलेलं नाही. उद्धवजी, पुन्हा एकदा शांततेत विचार करा झाड वाढवण्याचा”, असा सूचक सल्ला मुनगंटीवारांनी देताच सभागृहात चांगलाच हशा पिकला!

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-03-2023 at 16:30 IST

संबंधित बातम्या