अधिकाऱ्यांचे लॅपटॉप, पेनड्राइव्ह, ई मेल आयडी तपासण्याची भाजपची मागणी

मुंबई : प्रभाग पुनर्रचनेचा आराखडय़ावरून भाजपने आक्रमक भूमिका घेतली असून हा आराखडा सादर करताना त्यात बदल करण्यात आल्याचा आरोप भाजपने केला आहे. याप्रकरणी संबंधित पालिका अधिकाऱ्यांचे लॅपटॉप, संगणक व ईमेल आयडी तपासण्यात आले. अशी मागणी भाजपचे आमदार अमित साटम यांनी केली आहे. 

मुंबई महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०२२ मध्ये अपेक्षित असून या निवडणुकीसाठी पालिकेने प्रभागांच्या सीमा निश्चितीचा कच्चा आराखडा तयार करून तो नुकताच आयोगाला सादर केला आहे. त्यावरून सध्या पालिकेतील राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेनेच्या दबावाखाली हा आराखडा तयार करण्यात आला असून त्यात पक्षाला पूरक असे बदल शिवसेनेने केले असल्याचा आरोप भाजपने केला आहे. हा आराखडा सादर करण्यात मोठा घोटाळा केला असल्याचा आरोप आमदार अमित साटम यांनी केला आहे.

अधिकाऱ्यांनी सादर केलेला आराखडा आणि पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेला आराखडा हा वेगवेगळा आहे असा आरोप साटम यांनी केला आहे. त्यामुळे निवडणूक विभागाचे अधिकारी, माहिती तंत्रज्ञान विभागाचे अधिकारी यांचे लॅपटॉप, संगणक, पेन ड्राईव्ह व ईमेल आयडी तपासण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिकेतील राजकीय वातावरण तापू लागले असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. आराखडय़ामध्ये घोळ घालण्याबरोबरच मतदारयाद्यांमधून नावे वगळण्याचे कारस्थानही करण्यात आल्याचा आरोप साटम यांनी केला आहे. काही ठरावीक विभागातील लोकांची नावे वगळण्यात आली आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे.