BJP Unhappy on BMC results: मुंबई महानगरपालिकेत स्वतःचा महापौर बसविण्याचे स्वप्न भाजपा पक्ष कित्येक वर्षांपासून पाहत होता. २०२६ च्या निवडणुकीत भाजपाचे सर्वाधिक ८९ नगरसेवक निवडून आले आहेत. शिंदे सेनेच्या साथीने सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला असला तरी निकालावर भाजपा नेते खूश नसल्याचे वृत्त समोर येत आहे. भाजपा नेत्यांनी निर्धारित केलेल्या लक्ष्याहून कमी जागा मिळाल्या असल्याची चर्चा भाजपा वर्तुळात आहे. हिंदुस्तान टाइम्सने याबाबतचे सविस्तर वृत्त दिले आहे.
भाजपा नेतृत्वाने यंदा मुंबई महानगरपालिकेची सत्ता मिळवण्यासाठी जोरदार तयारी केली होती. २२७ सदस्य असलेल्या महापालिकेत किमान ११० जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. जेणेकरून बहुमताच्या ११४ या संख्येपर्यंत पोहोचता येईल. परंतू भाजपाला नव्वदीही पार करता आली नाही. यामुळे आता पक्ष कुठे कमी पडला, प्रचारात कोणती चूक झाली, याचा अंतर्गत आढावा घेण्यात येत आहे.
भाजपाच्या काही नेत्यांच्या हवाल्याने हिंदुस्तान टाइम्सने आपल्या वृत्तात म्हटले की, मुंबई विभागातील नेत्यांमध्ये समन्वयाचा अभाव, उमेदवारांची चुकीची निवड, उद्धव आणि राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या मराठी अस्मिता आणि मुंबईची ओळख या मुद्दयाला तोंड देण्यात भाजपा नेतृत्व कमी पडले, अशी भावना भाजपाच्या नेत्यांमध्ये आहे.
कमी जागा लढवल्यामुळे अपयश?
भाजपाने मुंबईतील १५५ हून अधिक जागा लढविण्याची योजना आखली होती. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने जागावाटपात शेवटपर्यंत ताणून धरल्यामुळे त्यांना ९१ जागा मिळाल्या. तर भाजपाने १३७ जागांवर निवडणूक लढवली. कमी जागा लढवत असताना भाजपाने ११० जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र त्यांना ८९ जागा मिळाल्या.
ठाकरेंच्या शिवसेनेचा मुंबईतील पाया भक्कम
मुंबई महानगरपालिकेच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा मुंबईतील पाया भक्कम असल्याचे दिसून आले आहे. गेल्या दोन वर्षांत ११४ आजी-माजी नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली होती. भाजपा-शिवसेनेचे (शिंदे) तगडे आव्हान असूनही ठाकरेंचे ६५ नगरसेवक निवडून आले आहेत. २०१७ च्या निवडणुकीत ठाकरेंच्या अखंड शिवसेनेचे ८४ नगरसेवक निवडून आले होते. त्यातील ५४ नगरसेवक त्यांची साथ सोडून गेले असल्याचे खुद्द उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यानंतरही शिवसेनेने (ठाकरे) चांगली कामगिरी केल्याचे दिसून आले आहे.
