आदिवासी भागातील पाठिंब्यामुळे भाजपच्या विजयाचा मार्ग मोकळा

नालासोपाऱ्यात हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला ४२ हजार मतांची आघाडी मिळाली.

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये विजयी झालेले भाजपचे राजेंद्र गावित यांनी कार्यकर्त्यांसह जल्लोष साजरा केला.

शहरी भागात पीछेहाटच; नालासोपाऱ्यात बहुजन विकास आघाडीला पसंती

वसई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या पालघर पोटनिवडणुकीत भाजपने विजय संपादन करीत सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होण्याचा शिवसेनेचा डाव यशस्वी होऊ दिला नाही. हा मतदारसंघ कायम राखून भाजपने आदिवासी पट्टय़ात आपली ताकद कायम असल्याचे स्पष्ट केले आहे. भाजपच्या विजयात आदिवासी पट्टय़ातील पाठिंबा महत्त्वाचा ठरला आहे.

आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी, खालच्या पातळीचा प्रचार, उमेदवारांची पळवापळवी, ‘साम, दाम, दंड, भेद’ याने गाजलेली मुख्यमंत्र्यांची वादग्रस्त ध्वनिफीत, बंद पडणारी मतदान यंत्रे यामुळे गाजलेल्या या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे पार पानिपत झाले, तर हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला फक्त शहरी भागातच कौल मिळाला.

चिंतामण वनगा यांच्या निधनाने पालघर लोकसभेची पोटनिवडणूक झाली.  सहानुभूतीचा लाभ उठविण्यासाठी नेत्याच्या घरातच उमेदवारी दिली जाते. राजकीय महत्त्वाकांक्षा जागृत झालेल्या वनगा यांच्या मुलाला भाजपकडून प्रतिसाद मिळेल, अशी आशा होती; पण भाजपने दुर्लक्ष केल्याने तो चलबिचल झाला. शिवसेनेने नेमक्या याच संधीचा फायदा घेत वनगा यांच्या पुत्राला पक्षात घेऊन उमेदवारी दिल्याने भाजपच्या गोटात खळबळ उडाली आणि इथेच नाटय़ाला सुरुवात झाली. भाजपने मग काँग्रेसच्या राजेंद्र गावितांना पक्षात घेऊन उमेदवारी दिली आणि दुसरे नाटय़ सुरू झाले. या पळवापळवीने प्रचारात आरोप-प्रतिआरोप होऊ  लागले.

वसई-विरार, नालासोपारा आणि पालघर-बोईसर हा शहरी, तर डहाणू, विक्रमगड, तलासरी, जव्हार, मोखाडा या आदिवासीबहुल अशा संमिश्र मतदारसंघात भाजपला ग्रामीण किंवा आदिवासीबहुल विभागाने साथ दिली. डहाणू (११ हजार), विक्रमगड (पाच हजार) मतांच्या आघाडीने भाजपचा विजयाचा मार्ग मोकळा झाला. नालासोपाऱ्यातील उत्तर भारतीय मतदारांची संख्या लक्षात घेता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना भाजपने प्रचारात उतरविले होते; पण नालासोपाऱ्यात हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला ४२ हजार मतांची आघाडी मिळाली. वसईतही ठाकूर यांच्या आघाडीला ३३ हजार मतांचे आधिक्य मिळाले.

मुख्यमंत्र्यांनी प्रतिष्ठेची केलेल्या या मतदारसंघात विजयामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे, तर २ लाख ४३ हजार मते घेऊन शिवसेनेने आपली ताकद दाखवून दिली आहे. बोईसर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला आघाडी मिळाली. पालघरमध्ये शिवसेनेला अपेक्षित यश मिळू शकले नाही. वसई आणि नालासोपाऱ्यात शिवसेनेला फारच कमी मते मिळाली. या दोन मतदारसंघांनी थोडी अधिक साथ दिली असती तर शिवसेनेने भाजपचा घाम काढला असता. काँग्रेसला आता आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. ५० हजारांचाही आकडा गाठता न आल्याने त्यांना तळावर जाण्याची नामुष्की ओढवली आहे. मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वाढलेल्या मतांकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bjp victory in palghar lok sabha bypoll due to support in tribal areas

ताज्या बातम्या