परळ येथील सप्ततारांकित हॉटेल पॅलेडियनमधील कामगारसत्ता भाजपने बळकावल्यामुळे ‘मातोश्री’च्या पायाखालची वीट थरारली असून भारतीय कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबरच स्थानिक आमदार, नगरसेवक आणि अन्य नेत्यांची ‘मातोश्री’ने झाडाझडती सुरू केली आहे. मुंबईतील सप्त आणि पंचतारांकित हॉटेल्समध्ये कामगारशक्तीच्या जिवावर सत्ता उपभोगणाऱ्या भारतीय कामगार सेनेला खिंडार पडू नये यासाठी शिवसेना नेत्यांची पळापळ सुरू झाली आहे. हॉटेल क्षेत्रात भाजपचा वारू चौखूर उधळण्यापूर्वीच त्याला रोखण्यासाठी सर्व हॉटेलमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ‘मातोश्री’ने त्रयस्थांची फौज उभी केली आहे.

हॉटेल पॅलेडियनमधील अंतर्गत कामगार संघटना भाजपप्रणीत कामगार सेनेच्या छत्राखाली आल्याने शिवसेनेची पंचाईत झाली आहे. एकेकाळी मराठी युवकांना मुंबईतील सप्त आणि पंचतारांकित हॉटेलमध्ये नोकरी मिळावी यासाठी शिवसेनेने मोठय़ा प्रमाणावर आंदोलने केली होती. शिवसेनेच्या दहशतीमुळे अनेक हॉटेल्सच्या व्यवस्थापनांनी मराठी युवकांना मोठय़ा संख्येने हॉटेल सेवेत सामावून घेतले होते. याच मराठी कर्मचाऱ्यांच्या जोरावर शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेने हॉटेलमध्ये आपले वर्चस्व निर्माण केले होते. परंतु हॉटेल पॅलेडियनच्या निमित्ताने भाजपने शिवसेनाप्रणीत कामगार सेनेला खिंडार पाडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे इतर हॉटेल्समधील आपली सत्ता कायम राहावी यासाठी ‘मातोश्री’ने हालचाली सुरू केल्या आहेत.
हॉटेल पॅलेडियनचा धडा घेऊन ‘मातोश्री’ने विविध हॉटेल्समधील परिस्थितीचा आढावा त्रयस्थांमार्फत घेण्यास सुरुवात केली आहे. हॉटेलमध्ये भारतीय कामगार सेनेचा दबदबा किती उरला आहे, सभासदांची संख्या किती आहे, पदाधिकारी कशा पद्धतीने काम करीत आहेत, व्यवस्थापन आणि कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे साटेलोटे आहे का, अंतर्गत अथवा अन्य कामगार संघटनांची परिस्थिती काय आहे, आदी बाबींची माहिती गोळा करण्याचे आदेश ‘मातोश्री’ने या त्रयस्थ व्यक्तींना दिले आहेत. परिणामी हॉटेल्समध्ये मनमानी कारभार करणाऱ्या भारतीस कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. हॉटेलमधील स्थितीचा आढावा नेमके कोण घेत आहे याची माहिती मिळविण्याचा प्रयत्न भारतीय कामगार सेनेचे पदाधिकारी करीत आहेत. मात्र भाजपने धक्का दिल्यामुळे हॉटेल क्षेत्रातील शक्ती पणाला लावण्याचा निर्धार शिवसेनेने केला असून दसरा मेळाव्यानंतर हॉटेल क्षेत्राकडे लक्ष केंद्रित करून भाजपचा वारू रोखण्याचा ‘मातोश्री’चा मनसुबा आहे.