मुंबई : राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पार धोक्यात आल्याचे अलीकडच्या घटनांवरून स्पष्ट होते. यामुळेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी सर्वसामान्यांची भूमिका असली तरी भाजप अशी मागणी करणार नाही. याउलट आम्ही सत्ताधाऱ्यांशी लढा देत राहू, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

हनुमान चालीसा महाराष्ट्रात नाही, तर काय पाकिस्तानात म्हणायची, असा सवाल फडणवीस यांनी केला. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर पोलीस ठाण्याबाहेर शिवसेना कार्यकर्त्यांकडून झालेल्या हल्ल्याप्रकरणी दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली. सोमय्या यांना झेड सुरक्षा असताना आणि पोलीस ठाण्याबाहेर असलेला कार्यकर्त्यांचा जमाव हल्ला करण्याची शक्यता असल्याचे सांगूनही पोलीस तो रोखू शकले नाहीत. झेड सुरक्षा असलेल्या व्यक्तीला पोलीस संरक्षण देऊ शकत नसतील, तर अन्य कोणी सुरक्षित राहू शकणार नाही. मुंबई पोलिसांच्या इतिहासातील लाजिरवाणा काळ सध्या सुरू असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले.

ठार मारण्याचा कट, सोमय्यांचा आरोप

मला ठार मारण्यासाठी सरकारपुरस्कृत हल्ला खार पोलीस ठाण्याबाहेर करण्यात आल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी  केला.

हल्ला होणार असल्याचे पोलिसांना सांगूनही बाहेर पडताच ७०-८० गुंडांनी हल्ला केला. मंत्रिमंडळ सचिव राजीवकुमार गौबा यांनी याप्रकरणी गृहसचिव अजय कुमार भल्ला यांना चौकशी करण्याची सूचना केली आहे. भाजप नेत्यांचे शिष्टमंडळ सोमवारी नवी दिल्लीला जाऊन  केंद्रीय गृहमंत्री व गृहसचिवांचा भेट घेऊन दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करणार आहेत.