मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या कारभारात पारदर्शकतेचा अभाव, निधीचे गैरव्यवस्थापन, निविदा न मागविताच कामांचे झालेले वाटप यावर भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांनी (कॅग) ताशेरे ओढल्याने आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेच्या ठाकरे गटाला शह देण्याकरिता भाजप या अहवालाचा योग्य तो राजकीय लाभ उठवेल अशीच चिन्हे आहेत.
राज्यात सत्ताबदल झाल्यावर मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराची भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांकडून (कॅग) चौकशी करण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले तेव्हाच ठाकरे गटावर कुरघोडीचा हा प्रयत्न असल्याचे स्पष्ट झाले होते. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराची चौकशी केलेला अहवाल विधिमंडळात सादर करून सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाने उद्धव ठाकरे गटाला मोठा झटका दिला आहे. चौकशी अहवालात मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढण्यात आल्याने पालिकेतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी भाजपच्या अमदारांकडून करण्यात आली. आगामी मुंबई महानगरपालिकेत शिवसेना ठाकरे गट सत्तेत असताना झालेल्या गैरव्यवहार आणि भ्रष्टाचारावरून शिवसेनेला अडचणीत आणण्याची भाजपची खेळी आहे.




आमदारांच्या मागणीनंतर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून योग्य त्या यंत्रणेकडून चौकशी करण्याचे फडणवीस यांनी दिलेले आश्वासन हे सारेच शिवसेनेची कोंडी करण्याची खेळी असल्याचे स्पष्टच दिसते. मुंबई महानगरपालिकेची सत्ता मिळविण्याचा निर्धार केलेल्या भाजपला ‘कॅग’ अहवालाचा आधाराच मिळाला आहे. भाजपकडून शिवसेनेच्या भ्रष्ट कारभारावर बोट ठेवले जाईल. तसेच लोकांमध्ये या अहवालाच्या माध्यमातून जनजागृती केली जाईल. योग्य त्या यंत्रणेकडून चौकशी करण्याचे सूतोवाच फडणवीस यांनी केल्याने सक्तवसुली संचालनालय (ईडी) किंवा अन्य यंत्रणांच्या माध्यमातून चौकशी सुरू करून निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेच्या ठाकरे गटाला अडचणीत आणणण्याची भाजपची खेळी असेल हेसुद्धा स्पष्ट होते.