सभागृहाबाहेर धक्काबुक्की, शिवीगाळप्रकरणी भाजप नगरसेविकांची तक्रार

मुंबई : वरळीच्या बीडीडी चाळीतील स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडर स्फोटात भाजलेल्या तीन महिन्यांच्या बाळाच्या मृत्यू प्रकरणावरून झालेल्या गोंधळानंतर पालिका सभागृहात भाजप आणि शिवसेना नगरसेवक परस्परांसमोर उभे ठाकले. सभागृहाबाहेरही भाजप नगरसेवक, नगरसेविकांना धक्काबुक्की, शिवीगाळ करण्यात आली. या प्रकरणी भाजप नगरसेविकांनी राज्य महिला आयोगाकडे धाव घेत या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना देण्याची विनंती आयोगाला केली आहे. या तक्रारीमध्ये स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे.  वरळीच्या बीडीडी चाळीतील एका घरात स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाला होता.

या स्फोटात तीन महिन्यांच्या बाळासह चौघे भाजले. त्यांना तातडीने नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात उपचारात हयगय झाल्याची चित्रफीत समाजमांध्यमांवर फिरू लागली आणि मुंबईकरांच्या संतापाचा पारा चढला. या बाळाचा ३० नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला. या प्रकरणाचा निषेध करून भाजपच्या नगरसेवकांनी पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य समितीच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला.

करोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात आल्यामुळे ३ डिसेंबर रोजी भायखळा येथील अण्णा भाऊ साठे सभागृहात पालिका सभागृहात झालेल्या पहिल्या प्रत्यक्ष बैठकीत बाळाच्या मृत्यूवरून गदारोळ झाला. या प्रकरणी भाजप नगरसेविकांनी बुधवारी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांकडे धाव घेऊन तक्रार नोंदविली आहे.

समुदायातील गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी महिला नगरसेविकांचा विनयभंग केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. स्थायी समिती अध्यक्षांच्या सांगण्यावरुन हा जमाव तेथे जमला असावा असा संशय भाजप नगरसेवकांनी तक्रारीमध्ये व्यक्त केला आहे. या प्रकरणी सर्वंकष चौकशी करुन दोषींविरुद्ध कडक कारवाई करण्याची शिफारस पोलिसांना करावी, अशी मागणी भाजप नगरसेविकांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांकडे केली आहे.

प्रकरण काय

भायखळा येथील अण्णा भाऊ साठे सभागृहात झालेल्या बैठकीत नायर रुग्णालयात झालेली हयगय सभागृहाच्या निदर्शनास आणून देताना स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी आक्षेपार्ह वक्तव्ये केली आणि त्यामुळे सभागृहात गोंधळ उडाला. भाजप आणि शिवसेना नगरसेवक परस्परांसमोर ठाकले. परिस्थिती हातघाईवर आली. मात्र वरिष्ठ नगरसेवकांनी मध्यस्ती करून परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र बैठक संपताच भाजप नगरसेवक सभागृहाबाहेर पडले. रस्त्यावर मोठा समुदाय जमला होता. या जमावने भाजप नगरसेवक, नगरसेविकांना धक्काबुक्की, शिवीगाळ केली.