मुंबई : कामगारांचे प्रलंबित प्रश्न आणि मालवाहतूक क्षेत्रातील चालकांना भेडसावणाऱ्या समस्यांवरून भाजप्रणित अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाने मुंबई आणि नवी मुंबईतील कार्गो सेवा बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे. गुरुवारी (५ नोव्हेंबर) दुपारी दोन वाजल्यापासून सहार कार्गो संकुल, सुतार पाखाडी, सहार व्हिलेज, विलेपार्ले येथे संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनामुळे मुंबई आणि नवी मुंबईतील कार्गो वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघ ही भाजपशी संलग्न कामगार संघटना असून, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे या संघटनेचे अध्यक्ष आहेत. गेल्या काही महिन्यांत संघटनेने मुंबईतील विमानतळ, कार्गो आणि वाहतूक क्षेत्रातील कामगारांमध्ये संघटनात्मक विस्तार केला आहे. २ नोव्हेंबर रोजी मुंबई विमानतळावरील ग्राउंड हँडलिंग, सहार कार्गो आणि वसई-विरार महापालिका क्षेत्रातील हजारो कामगारांनी संघटनेत प्रवेश केल्याचा दावा करण्यात आला होता. त्यात सहार कार्गोमधील भारतीय कामगार सेनेशी संबंधित सुमारे ५०० कामगार आणि वाहतूकदारांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले होते. विमानतळाच्या टर्मिनल-२ वरील एजीएच एअरपोर्ट सर्व्हिसेसमधील ग्राउंड हँडलिंग कर्मचाऱ्यांनीही संघटनेत प्रवेश केल्याचा दावा संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. येथील कर्मचारी संघटनांवर कायम शिवसेना उद्भव ठाकरे आणि नंतरच्या काळात एकनाथ शिंदे गट, काही प्रमाणात मनसेचा वरचष्मा राहिला आहे. संघटनेच्या विस्तारानतर होणारे हे आंदोलन भाजपची कामगार संघटनांवरील ताकद दाखवून देणारे ठरेल.
यापूर्वी मे महिन्यातही या संघटनेने मुंबई विमानतळावरील एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन केले होते. त्या वेळी ग्राउंड स्टाफ, काउंटर कर्मचारी आणि हँडिमन सहभागी झाल्याने काही विमानांच्या सेवांवर परिणाम झाला होता. कामगारांवर होणारा अन्याय आणि ट्रान्सपोर्ट चालकांच्या अडचणींकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने आंदोलनाचा निर्णय घेतल्याचे संघटनेचे सरचिटणीस सुहास माटे यांनी सांगितले.
विमान वाहतूक विस्कळीत?
सहार कार्गोमधील मालाची चढ-उतार, वर्गीकरण, साठवणूक आणि ट्रकद्वारे होणारी वाहतूक यामध्ये सहभागी कर्मचारी आंदोलनात उतरल्यास मालवाहतूक विस्कळीत होऊ शकते. ग्राउंड हँडलिंगमध्ये सहभागी कर्मचारीही आंदोलनात उतरल्यास विमानांचे सामान चढवणे-उतरणे, विमानांची टर्नअराउंड प्रक्रिया आणि काही विमानांच्या वेळापत्रकावर परिणाम होऊ शकतो. कार्गो कर्मचारी आणि प्रवासी विमानांच्या ग्राउंड हँडलिंगचे किती कर्मचारीयात सहभागी होतात यावर अवलंबून असेल.
यापूर्वी मे महिन्यात याच संघटनेशी संबंधित एआयएएसएल कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे मुंबई विमानतळावरील काही आगमन विमानांनाही विलंब झाला आणि प्रवाशांचे सामान मिळण्यास उशीर झाला होता. त्यामुळे ग्राउंड हँडलिंग कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्यास प्रवासी विमानसेवेवरही परिणाम होऊ शकतो.
भाजपशी संलग्न असलेल्या या संघटनेने विमानतळ आणि कार्गो क्षेत्रातील कामगारांमध्ये आपला संघटनात्मक विस्तार वाढविला आहे. त्या पार्श्वभूमीवर होणारे हे आंदोलन किती यशस्वी ठरते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
संघटनेनेच्या मागण्या
- कामगारांसाठी किमान वेतन कायद्यानुसार वेतन लागू करा
- कामगारांच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपयांची समूह मुदत विमा पॉलिसी द्यावी, वैद्यकीय विम्याचा हप्ता मालक आणि कर्मचारी यांच्यात समान प्रमाणात विभागावा
- कामगारांना कारणाशिवाय कामावरून कमी करणे किंवा निलंबित करणे थांबवावे, त्यांच्या संमतीशिवाय बदल्या करू नयेत.
- कामगारविरोधी कायदे रद्द करावेत, अशीही संघटनेची मागणी आहे.
- अतिरिक्त कामाचा मोबदला (ओव्हरटाइम) कायद्यानुसार पूर्ण द्यावा आणि कामगारांची दिशाभूल करणारे प्रकार थांबवावे.
