मुंबई : निवडणूकीच्या तोंडावर पुन्हा एकदा धर्माच्या नावाने राजकारण सुरू झाले असून मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये भगवद्गीता पठण करण्याची जुनीच मागणी भाजपच्या नगरसेविकेने पुन्हा एकदा केली आहे. महापालिकेची मुदत संपण्यापूर्वी याबाबतची ठरावाची सूचना मंजूर झाली होती. त्याची गेल्या तीन वर्षात अंमलबजावणी झालेली नाही त्यामुळे सभागृहाच्या ठरावानुसार महापालिकेच्या सर्व शाळांमधून भगवद्गीता पठण करण्याच्या सूचना शिक्षण विभागाला द्याव्यात अशी मागणी भाजपच्या माजी नगरसेविकेने पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे केली आहे.

मालाडमधील भाजपच्या माजी नगरसेविका योगिता कोळी यांनी फेब्रुवारी २०२२ मध्ये महापालिकेच्या शाळांमधून भगवद्गीता पठण केले जावे जेणेकरुन भावी पिढीवर योग्य संस्कार होतील, अशा प्रकारची ठरावाची सूचना मांडली होती. पालिकेची मुदत संपण्याच्या काही दिवस आधी झालेल्या पालिका महासभेत ही ठरावाची सूचना मंजूर झाली होती. मात्र त्यानंतर पालिका संपुष्टात आली व नंतर तीन वर्षे पालिकेची निवडणूकच झालेली नाही. त्यामुळे हा विषय मागे पडला होता. दरम्यान, योगिता कोळी यांनी मार्च २०२३ मध्ये तत्कालिन पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांना महापालिका शाळांमध्ये भगवद्गीता पठण करण्याबाबत पत्र दिले होते.

आता पुन्हा एकदा पालिका निवडणूकीच्या तोंडावर या विषयाने डोके वर काढले असून कोळी यांनी या पत्राच्या अंमलबजावणीची मागणी केली आहे. सभागृहाच्या ठरावानुसार महापालिकेच्या सर्व शाळांमधून भगवद्गीता पठण करण्याच्या सूचना आपण शिक्षण विभागाला देऊन याची त्वरीत अंमलबजावणी करावी अशी मागणी कोळी यांनी केली आहे.

ठरावाची सूचना काय ?

योगिता कोळी यांनी आपल्या ठरावाच्या सूचनेत म्हटले आहे की भगवद्गीता हा विश्वाला शांत आणि संयमाने, तसेच मन व चित्त शांत ठेवणे तसेच खरे आणि खोटे यातील फरक शिकवणारा प्राचिन हिंदूचा पवित्र ग्रंथ आहे. ह्या ग्रंथाची निर्मिती पाच हजार वर्षांपूर्वी महर्षी वेदव्यास यांनी केली आहे. पाच हजार वर्षापूर्वी श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली होती, अशी नोंद आहे. भगवद्गीता हा प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान विषयक ग्रंथ आहे. भारतीय या ग्रंथाला पवित्र धर्मग्रंथ समजतात. त्यामुळे न्यायालयात गीतेवर हात ठेवून शपथ घेण्याची प्रथा पडली आहे.

भगवद्गीता हा हिंदुस्थानातला अतिशय महत्त्वाचा व मानवी इतिहासातल्या ग्रंथांपैकी अतिशय तत्त्वज्ञानावर आधारलेला महत्त्वाचा संदर्भग्रंथ आहे. हा ग्रंथ मानवाला परमोच्च ज्ञान देतो आणि जीवन कसे जगावे यांचे मार्गदर्शन करतो असे मानले जाते. जगातील विविध देशांतले व विविध धर्मांतले असंख्य तत्त्ववेत्ते, शास्त्रज्ञ आणि विचारवंत यांनी या ग्रंथाबद्दल कायमच गौरवोद्गार काढले आहेत. महापालिकेच्या शाळांमधून भगवद्गीता पठण केल्यास भावी पिढीवर योग्यप्रकारचे संस्कार होतील, असे त्यांनी म्हटले आहे.