सहकारी महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी भारतीय जनता युवा मोर्चाचा (भाजयुमो) मुंबई शहराध्यक्ष गणेश पांडेय याचा पक्षाकडून राजीनामा घेण्यात आला आहे. या तरूणीने भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. मात्र, पांडेयने मला राजकीय षडयंत्रात गोवल्याचा दावा केला आहे.
संबंधित तरूणीने शेलारांना लिहलेले पत्र ‘मुंबई मिरर’ या वृत्तपत्रात हे पत्र छापून आले आहे. मथुरेत पक्षाच्या एका परिषदेनिमित्त सर्व कार्यकर्ते एका हॉटेलमध्ये उतरले असताना हा प्रकार घडला. ४ मार्च रोजी पांडेय याने रात्रीच्या वेळी तरूणीला खोलीत बोलावले. त्यावेळी गणेश पांडेय आणि त्याचे सहकारी मद्यपान करत होते. मला पाहिल्यानंतर खोलीतील सर्वजण जोरजोरात हसू लागले. त्यानंतर पांडेयने मला तु व्हर्जिन आहेस का, असा प्रश्न विचारला. मी त्याच्या प्रश्नाला सडेतोड उत्तर देऊन बाहेर पडले तेव्हा पांडेयने माझा पाठलाग करून मला परत खोलीत आणण्याचा प्रयत्न केला. माझ्यासोबत असं घाणेरडे वर्तन चालणार नाही, असे बजावून मी माझ्या खोलीत निघून गेले. मात्र, पांडेय त्याच्या सहकाऱ्यांसह माझ्या खोलीपर्यंत आला. त्याने दरवाज्यावर जोराने लाथा मारल्या. तसेच मोठ्या आवाजात पॉर्न क्लिपही लावली. यानंतर मी तुला एकदा तरी स्पर्श करीन, तू माझी तक्रार केलीस तरी मला त्याची पर्वा नाही, अशी धमकीही दिल्याचे तरूणीने पत्रात म्हटले आहे.  दरम्यान, हा सगळा प्रकार उघडकीस आल्यानंतर विरोधकांकडून भाजपवर जोरदार टीका करण्यात येत आहे. याप्रकरणाची तक्रार अद्याप पोलिसांकडे का करण्यात आली नाही, असा सवालही विरोधकांकडून उपस्थित करण्यात आला आहे.