लोकसत्ता प्रतिनिधी मुंबई: दरवर्षी जूनमध्ये केल्या जाणाऱ्या पाणीपट्टी दरवाढीला भाजपने विरोध केला आहे. पाणी पुरवठ्यासाठी होणाऱ्या खर्चाचा आढावा घेऊन त्याआधारे दरवर्षी पाणीपट्टी वाढवली जाते. अद्याप पाणीपट्टी दरवाढ जाहीर झाली नसली तरी भाजपने आधीच या दरवाढीला विरोध दर्शवला आहे. तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार व तुळशी या सात धरणांतून मुंबईला दररोज ३,८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. कित्येक किलोमीटर लांबून पाणी शुद्ध करून मुंबईकरांना त्याचा पुरवठा केला जातो. मुंबईकरांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी जलशुद्धीकरण करणे, पाणी पुरवठा यंत्रणेत सुधारणा करणे, जुन्या व जीर्ण झालेल्या जलवाहिन्या बदलणे, गळती दुरुस्त करणे, देखभाल व दुरुस्ती करणे अशी विविध कामे करावी लागतात. या सर्व कामांसाठी पालिकेला येत असलेल्या खर्चाच्या तुलनेत पाणीपट्टी आकारली जाते. दरवर्षी या खर्चात वाढ होत असते. खर्चाचा आढावा घेऊन लेखापाल विभागामार्फत पाणीपट्टीत वाढ सुचवली जाते. पाणीपट्टीत दरवर्षी जास्तीत जास्त आठ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा ठराव २०१२ मध्ये स्थायी समितीत मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार दरवर्षी जून महिन्यात काही टक्के वाढ केली जाते. त्याची अंमलबजावणी १६ जूनपासून केली जाते. आणखी वाचा-मुंबई: डॉ. सुधाकर शिंदे यांनी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला यंदाही लेखापाल विभागाने खर्चाबाबतचा आपला प्रस्ताव प्रशासनाकडे पाठवला असल्याची चर्चा आहे. पालिकेने प्रस्तावित केलेल्या पाणीपट्टी दरवाढीला भाजपाचा विरोध असल्याची भूमिका मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ऍड्. आशिष शेलार यांनी मांडली आहे. एका बाजूला मुंबईकरांना मालमत्ता करात सूट देऊन एका हाताने द्यायचे आणि दुसऱ्या बाजूला पाणीपट्टी वाढवून दुसऱ्या हाताने काढून घ्यायचे हे चालणार नाही. मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना विनंती आहे की, त्यांनी ही पाणीपट्टी वाढ होण्यापासून रोखावी असे त्यांनी म्हटले आहे.