मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून वांद्रे – कुर्ला संकुल येथील सिटी पार्क मैदान नागरिकांसाठी बंद आहे. मात्र त्याचवेळी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) अधिकारी सिटी पार्कचा वापर करत आहेत. केवळ अधिकाऱ्यांना आणि त्यांच्या नातेवाईकांना या मैदानाचा वापर करता येत आहे. यावर स्थानिक आमदार वरुण सरदेसाई यांनी आक्षेप घेत याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे. याप्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची, तसेच जबाबदार अधिकाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी केली.
५ एकरावर सिटी पार्क
बीकेसी येथे ५ एकर जागा मनोरंजन केंद्र म्हणून राखीव आहे. या जागेचा विकास काही वर्षांपूर्वी एमएमआरडीएकडून करण्यात आला आहे. सिटी पार्क नावाने येथे उद्यान तयार करण्यात आले असून, यात खेळण्यासाठीच्या अनेक सुविधा उपलब्ध आहेत. या सिटी पार्कचा वापर मोठ्या संख्येने नागरिकांकडून केला जात होता. पण मागील काही वर्षांपासून ५ एकरचे हे पार्क नागरिकांसाठी बंद करण्यात आले. पार्कच्या बाहेरील परिसर तर ओसाड पडला आहे. मात्र पार्कमधील परिसराची योग्य प्रकारे देखभाल-दुरुस्ती केली जात आहे. तरीही हा परिसर नागरिकांसाठी बंद आहे. दरम्यान, पार्क नागरिकांसाठी खुले होते तेव्हा आतील परिसरासाठी नागरिकांकडून शुल्क आकारले जात होते. पण आता मात्र पार्कचा आतील परिसर नागरिकांसाठी बंद असून एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांसाठी, त्यांच्या नातेवाईकांसाठी खुला आहे. त्यासाठी त्यांच्याकडून कोणतेही शुल्क घेतले जात नाही. सिटी पार्कलगत एमएमआरडीएचे जेतवन नावाचे सेवानिवासस्थान आहे. या निवासस्थानात राहणारे अधिकारी या पार्कचा वापर करीत आहेत. यावर वरुण सरदेसाई यांनी आक्षेप घेतला आहे.
करदात्यांनाच प्रवेशबंदी
मनोरंजनासाठी राखीव असलेल्या जागेवरील पार्कचा वापर केवळ अधिकारी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठीच का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. तर पार्कच्या देखभालीसाठी करदात्यांच्याच पैशांचा वापर केला जात असताना करदात्यांना प्रवेशबंदी का, असा सवाल करून त्यांनी याविषयी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली. सिटी पार्कचा एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांकडून हा गैरवापर होत आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी. यासाठी जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून केल्याची माहिती वरुण सरदेसाई यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. दरम्यान, याविषयी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही.
