मुंबई : वांद्रे – कुर्ला संकुल परिसरातील दोन भूखंडांच्या ई लिलावासाठीच्या निविदेत ज्युपिटर लाईफ लाईन हाॅस्पिटल्स आणि डी. वाय. पाटील एज्युकेशन ग्रुपने बाजी मारली होती. अखेर आता वर्षभराने या दोन्ही संस्थंना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) भूखंड वाटपासाठी देकारपत्र वितरीत करण्यात आले. त्यामुळे आता बीकेसीत ज्युपिटर रूग्णालय आणि डी. वाय. पाटील विद्यापीठ उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या भूखंडाच्या ई लिलावातून एमएमआरडीएला ५८० कोटी रुपये मिळाले आहेत.

एमएमआरडीएने बीकेसीतील सात भूखंडांच्या ई लिलावासाठी निविदा मागविल्या होत्या. निविदा फेब्रुवारी २०२५ मध्ये खुल्या केल्या असता सातपैकी दोन भूखंडालाचा प्रतिसाद मिळाल्याचे निदर्शनास आले. रुग्णालयाच्या १०,०२६.४४ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडासाठी मुंबईतील नामांकित ज्युपिटर लाईफ लाईन हॉस्पिटल लिमिटेड आणि फोर्टीस हॉस्पिटल लिमिटेडने निविदा सादर केल्या होत्या. तर ५११७.८५ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या शैक्षणिक वापरासाठीच्या भूखंडासाठी डी. वाय. पाटील आणि भारती विद्यापीठाकडून निविदा सादर झाली होती. त्यानुसार रुग्णालायासाठीच्या निविदेत ज्युपिटरने, तर शैक्षणिक वापरासाठीच्या निविदेत डी. वाय. पाटील संस्थेने बाजी मारली. आता वर्षभरानंतर या भूखंडांचे देकारपत्र या दोन्ही संस्थांना वितरीत करण्यात आले.

उपमुख्यमंत्री आणि एमएमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि महानगर आयुक्त डाॅ. संजय मुखर्जी, नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असीम गुप्ता यांच्या उपस्थितीत बुधवारी देकार पत्र वितरीत करण्यात आले. ज्युपिटर लाईफ लाईन हॉस्पिटल्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अजय ठक्कर आणि डी. वाय. पाटील विद्यापीठाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. विजय पाटील यांनी देकार पत्र स्वीकारले.

रुग्णालयाच्या भूखंडासाठी १,७६,५३३.२५ रुपये प्रति चौरस मीटर दरानुसार एमएमआरडीएला ३५४ कोटी मिळाले. तर शैक्षणिक वापरासाठीच्या भूखंडासाठी २,१९,८१९ रुपये प्रति चौरस मीटर दरानुसार एमएमआरडीएला २२५ कोटी रुपये मिळाले. दोन्ही भूखंड मिळून एमएमआरडीएला एकूण ५८० कोटी रुपये मिळाले. या दोन्ही भूखंडांसाठीचे देकारपत्र वितरित झाल्याने आता तेथे बांधकाम करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बीकेसीत आता लवकरच ज्युपिटर रुग्णालय आणि डी. वाय. पाटील विद्यापीठ उभे राहणार आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी शैक्षणिक आणि आरोग्याची एक चांगली सुविधा उपलब्ध होणार आहे.