मुंबई : अंधेरी पश्चिम – मंडाले, मानखुर्द मेट्रो २ ब च्या कामादरम्यान वांद्रे – कुर्ला संकुलात यांत्रिक बिघाडामुळे सुमारे ४०० टन वजनाची मोबाइल क्रेन उलटली. गर्डर उचलताना ही दुर्घटना घडली असून सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही. मात्र यामुळे बीकेसीतील वाहतुकीवर परिमाण झाला आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मेट्रो २ ब चे काम हाती घेतले आहे. या कामाअंतर्गत पहाटे साडे चारच्या सुमारास बीकेसीतील एशियन हॉर्ट रुग्णालयाजवळ गर्डर स्थापित करताना ४०० टन वजनाच्या क्रेनमध्ये यांत्रिक बिघाड झाला आणि क्रेन उलटली. भलीमोठी क्रेन उलटल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. याचा वाहतुकीवर परिणाम झाला आहे. क्रेन हटवून वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी वाहतूक पोलिस आणि एमएमआरडीएकडून प्रयत्न सुरू आहेत. लवकरच क्रेन हटवून वाहतूक पूर्ववत केली जाईल, असे एमएमआरडीएच्या अधिकार्यांनी सांगितले.

जे. कुमारचा निष्काळजीपणा सुरूच

मेट्रोच्या वा इतर प्रकल्पांच्या कामादरम्यान कंत्राटदार जे. कुमार कंपनीकडून सातत्याने निष्काळजीपणा केला जात आहे. दहिसर – मिरा-भाईंदर मेट्रो ९ च्या कामादरम्यान या कंपनीच्या निष्काळजीपणामुळे सातहून अधिक छोटे-मोठे अपघात झाले असून यात सहा जणांचा बळी गेला आहे. बीकेसीतील एका उड्डाणपुलाच्या कामादरम्यान पुलाचा भाग कोसळल्याने अनेक जण जखमी झाले होते. मिरा-भाईंदर उड्डाणपुलाच्या कामादरम्यानही कंत्राटदाराकडून अनेक अपघात झाले आहेत. जे. कुमारला निष्काळजपणासाठी सहा-सात कोटींहून अधिकचा दंड आकारण्यात आला आहे. मात्र कोणतीही कठोर कारवाई करण्यात आलेली नाही.