मुंबई : वांद्रे – कुर्ला संकुलात दर शुक्रवारी पाळण्यात येणाऱ्या साप्ताहिक सार्वजनिक वाहतूक दिन उपक्रमाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. अधिकाधिक प्रवाशांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा यासाठी आता मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) पुढाकार घेतला आहे. दर शुक्रवारी आरे – कफ परेड भुयारी मेट्रो ३ मार्गिकेवरील बीकेसी मेट्रो स्थानकाबाहेरून बीकेसीतील काही परिसरासाठी मोफत फीडर बस सेवा चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे बीकेसी मेट्रो स्थानकापासून इच्छितस्थळी, आपल्या कार्यालयापर्यंत पोहोचणे आता प्रवाशांना सोपे होणार आहे.

बीकेसीतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी, प्रदूषण कमी करण्यासाठी आणि सार्वजनिक वाहतुकीकडे नागरिकांना वळविण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए), एमएमआरसी आणि अन्य सरकारी यंत्रणांनी दर शुक्रवारी बीकेसीत सार्वजनिक वाहतूक दिवस पाळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १२ जूनला पहिला सार्वजनिक वाहतूक दिवस पाळण्यात आला. मात्र बीकेसीतील प्रवाशांनी या उपक्रमाला प्रतिसाद न दिल्याने पहिल्या सार्वजनिक वाहतूक दिवसाचा चांगलाच फज्जा उडाला.

त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या सार्वजनिक वाहतूक दिनाकडेही नागरिकांनी पाठ फिरवली. नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने उपक्रमाचा हेतू साध्य होत नाही. दरम्यान, बीकेसीतील अंतर्गत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत नसल्याने नागरिकांचा या उपक्रमास प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. वांद्रे रेल्वे स्थानक, कुर्ला रेल्वे स्थानकापासून बीकेसीचे अंतर बरेच आहे. तर बीकेसी मेट्रो स्थानकापासून महत्त्वाची कार्यालये दूर आहेत. त्यामुळे कार्यालय गाठण्यासाठी कसरत करण्याऐवजी वैयक्तिक दुचाकी वा चारचाकीचा वापर करण्याकडे बीकेसीत नोकरीनिमित्त येणाऱ्यांचा कल आहे.

या पार्श्वभूमीवर बीकेसी मेट्रो स्थानकापासून प्रवाशांना बीकेसीतील इच्छितस्थळी पोहोचणे सोपे व्हावे आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढावा यासाठी एमएमआरसीने आता मोफत फीडर बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दर शुक्रवारी बीकेसी मेट्रो स्थानक येथील प्रवेशद्वार ए-१ आणि ए-२ येथून सिटीफ्लो बस सेवा मोफत पुरविली जाणार आहे. प्रवाशांना शुक्रवारी तिकिटासाठी पैसे मोजावे लागणार नाहीत. बीकेसी मेट्रो स्थानक ते जिओ वर्ल्ड प्लाझा, वन बीकेसी, जेतवन एमएमआरडीए सेवा निवासस्थान, कलानगर, बीडीबी गेट क्रमांक ७, आयसीआयसीआय बस थांबा आणि क्रेसेन्झो या प्रमुख ठिकाणी प्रवाशांना विनामूल्य प्रवास करता येणार आहे.