मुंबई : वांद्रे – कुर्ला संकुलात दर शुक्रवारी स्वैच्छिक सार्वजनिक वाहतूक दिन उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाअंतर्गत शुक्रवारी पहिला सार्वजनिक वाहतूक दिन पाळण्यात आला. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) बीकेसीतील सर्व संस्था, कंपन्यांना आणि कामानिमित्त येणाऱ्या सुमारे दोन लाख कर्मचाऱ्यांना सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र या आवाहनाला दररोज बीकेसीत कामानिमित्त येणाऱ्यांनी अत्यल्प प्रतिसाद दिला. बीकेसीत नेहमीप्रमाणे शुक्रवारीही वाहने धावत होती. सार्वजनिक वाहतुकीद्वारे इच्छित स्थळी, कार्यालयापर्यंत पोहोचणे अवघड असल्याने अनेकांनी शुक्रवारीही वैयक्तिक वाहनांचा वापर करून कार्यालय गाठणे पसंत केले.
आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक केंद्र म्हणून विकसित होत असलेल्या बीकेसीत आजघडीला वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. तर बीकेसीत येणाऱ्या-जाणाऱ्यांची संख्या पाहता उपलब्ध वाहतुकीचे पर्याय अपुरे पडतात. तर दुसरीकडे बीकेसीत वैयक्तिक वाहनांनी येणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. वाहनांची संख्या वाढल्याने बीकेसीत प्रदूषणाचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच इंधनटंचाईचा प्रश्न भेडसावत आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन एमएमआरडीएने साप्ताहिक सार्वजनिक वाहतूक दिवस उपक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार दर शुक्रवारी बीकेसीत सार्वजनिक वाहतूक दिवस पाळला जाणार आहे. या दिवशी नागरिकांनी मेट्रो, बेस्ट, रेल्वे, रिक्षा-टॅक्सीचा वापर करणे अपेक्षित आहे. या उपक्रमात सहभागी होणे ऐच्छिक असले तरी या उपक्रमात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होत बीकेसीतील वाहतूक कोंडी कमी करण्यास, प्रदूषण कमी करण्यास मदत करावी असे उद्दिष्ट एमएमआरडीएचे आहे. त्यानुसार शुक्रवारी पहिला साप्ताहिक सार्वजनिक वाहतूक दिवस पार पडला. मात्र पहिल्या दिवशी या उपक्रमाला अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे.
एमएमआरडीएच्या आवाहनाला बीकेसी प्रॉपर्टीज असोसिएशन, सेबी, नमन ग्रुप, डायमंड मार्केटसारख्या कंपन्यांनी प्रतिसाद दिला. मात्र तरीही प्रत्यक्षात बीकेसीत नेहमीप्रमाणेच परिस्थिती होती. तुरळक प्रमाणात वाहनांची संख्या कमी होती. बीकेसी परिसर कुर्ला रेल्वे स्थानक आणि वांद्रे रेल्वे स्थानकापासून दूर आहे. तर मेट्रो ३ (आरे ते कफ परेड) मार्गिकेचे स्थानक बीकेसीतील मुख्य रस्त्यावर असून बीकेसीतील कंपन्या, कार्यालये, संस्था मेट्रो स्थानकापासून दूर आहेत. त्यामुळे बीकेसीत वा बीकेसीतील कार्यालयापर्यंत पोहोचण्यासाठी रिक्षा, टॅक्सीचा पर्याय निवडावा लागतो आणि हा प्रवास त्रासदायक असतो. हा त्रास टाळण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक दुचाकी वा चारचाकीचा वापर करतात. याच कारणामुळे शुक्रवारीही मोठ्या संख्येने बीकेसीत येणाऱ्यांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर न करता दुचाकी-चारचाकीला पसंती देत कार्यालय गाठले.
एमएमआरडीएचे सर्व अधिकारी-कर्मचारी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करून कार्यालयात पोहोचले. दरम्यान, बीकेसीतील केंद्र सरकारच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनाही उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन एमएमआरडीएने केले आहे. या आवाहनाला त्यांच्याकडून प्रतिसाद देण्यात आला असला तरी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव सार्वजनिक वाहतुकीचा वापर करता येणार नसल्याचे कार्यालयाकडून सांगण्यात आले. तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत नसल्याने आणि रेल्वे स्थानक, बसस्थानक तसेच मेट्रो स्थानकापासून इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी रिक्षा-टॅक्सीचाच वापर करावा लागतो. त्यामुळे दुचाकी-चारचाकीने प्रवास सोयीचा ठरतो. जर सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवायचा असेल, असे उपक्रम राबवायचे असतील तर आधी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करा, असे मत नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत होते. या उपक्रमाचे सर्वांना कौतुक होते. मात्र बीकेसीत पोहोचण्यासाठी करावी लागणारी कसरत पाहता वैयक्तिक वाहनाचा पर्याय योग्य असल्याचेही नागरिकांचे म्हणणे होते. त्यामुळेच शुक्रवारी या उपक्रमाचे कौतुक झाले, मात्र प्रत्यक्षात प्रतिसाद काही म्हणावा तसा मिळाला नाही.
आजच्या उपक्रमाअंतर्गत करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सार्वजनिक वाहतुकीचा वापर करून बीकेसीत पोहोचणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार. आजचा पहिला दिवस होता. त्यामुळे अनेकांना या उपक्रमाबाबत माहिती नव्हती. पण यापुढे या उपक्रमाची माहिती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचेल आणि उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळेल. – डॉ. संजय मुखर्जी, महानगर आयुक्त
टिळक नगर – बीकेसी ३०० रुपयेटिळक नगर रेल्वे स्थानकाबाहेरील एका रिक्षाचालकाला बीकेसीसाठी विचारले असता त्याने ३०० रुपये असे भाडे सांगितले. मीटरने येण्यास रिक्षाचालकाने स्पष्ट नकार दिला. इतकेच नव्हे तर त्यानंतर शेअर रिक्षाचा पर्याय देत प्रत्येक प्रवाशाला २०० रुपये असे भाडे सांगितले. – प्रतिक शिंदे
