मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) साप्ताहिक सार्वजनिक वाहतूक दिन उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दर शुक्रवारी वांद्रे-कुर्ला संकुलात साप्ताहिक सार्वजनिक वाहतूक दिन साजरा केला जाणार आहे. या दिवशी बीकेसीत येण्या-जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर केला जाणार आहे. त्यानुसार बीकेसीत कामाच्या निमित्ताने येणाऱ्या दोन लाख नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे आवाहन एमएमआरडीएकडून करण्यात आले आहे.

नागरिकांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, असे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे. राज्य सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांना सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे आणि वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांना आठवड्यातून किमान एकदा मेट्रो, उपनगरीय रेल्वे किंवा बेस्ट बसने प्रवास करण्याचे आवाहन करणारे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. पंतप्रधान आणि राज्य सरकारच्या या आवाहनांना प्रतिसाद देत एमएमआरडीएने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त डब्ल्यूआरआय इंडियाच्या सहकार्याने साप्ताहिक सार्वजनिक वाहतूक दिन उपक्रमाचा शुभारंभ केला. सरकारी अधिकारी, वाहतूक संस्था, कॉर्पोरेट क्षेत्रातील प्रतिनिधी आणि गतिशीलता क्षेत्रातील तज्ज्ञ यांच्या उपस्थितीत झालेल्या उच्चस्तरीय गोलमेज परिषदेत नुकतीच या उपक्रमाची घोषणा करण्यात आली होती. या घोषणेनुसार मुंबईतील आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक केंद्र म्हणून ओळखले जाणाऱ्या बीकेसीत साप्ताहिक सार्वजनिक वाहतूक दिन उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी सामूहिक ठरावही करण्यात आला आहे. त्यानुसार आता दर शुक्रवारी बीकेसीत सार्वजनिक वाहतूक दिन उपक्रम राबविण्यात येणार असून या दिवशी अधिकाधिक कर्मचारी-अधिकाऱ्यांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

बीकेसीत कामानिमित्त येणारे अधिकाधिक नागरिक वैयक्तिक वाहने, टॅक्सी आणि रिक्षाचा वापर करतात. केवळ २५ टक्के प्रवासी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करतात. ५४ टक्के प्रवाशांना दररोज प्रवासासाठी दोन तासांपेक्षा अधिक वेळ लागतो. तर प्रत्येक पाच प्रवाशांपैकी एका प्रवाशाचा प्रवास तीन तासांपेक्षा अधिक कालावधीचा असतो. मेट्रो स्थानक, रेल्वे स्थानक, बस स्थानकापासून इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी मर्यादित वाहतूक पर्याय असल्याने नागरिक वैयक्तिक वाहने, रिक्षा, टॅक्सीचा वापर करतात. दरम्यान, ८२ टक्के प्रवासी सार्वजनिक वाहतूक वापरण्यास तयार आहेत. मात्र त्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था तितकी बळकट असण्याची त्यांनी मागणी केली आहे. या सर्व बाबी लक्षात घेता नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीकडे वळविण्यासाठी एमएमआरडीएने साप्ताहिक सार्वजनिक वाहतूक दिन उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमास शुक्रवारपासून सुरुवात होईल आणि दर शुक्रवारी अधिकाधिक प्रवाशांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा यासाठी एमएमआरडीएचा प्रयत्न असणार आहे.