कुलदीप घायवट
दिवसेंदिवस मुंबईतील जीवनचक्र बदलत चालले आहे. झाडाझुडपांची, पाणथळ प्रदेशाची जागा उंच इमारतींनी, मोठमोठय़ा विद्युत खांबांनी घेतलेली आहे. नैसर्गिक अधिवासाचा ऱ्हास होत असताना अनेक पक्षी बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास शिकले आहेत. त्यात घारींचा क्रमांक अग्रस्थानी आहे. शहरीकरणामुळे अधिवासात झालेले बदल घारीने आत्मसात केले असून स्वत:चे अस्तित्व टिकवून ठेवले आहे.




मुंबईत सहजपणे वावरणारी घार शिकारी पक्षी आहेत. आकाशात उंचावरून घिरटय़ा घालत असताना, तीक्ष्ण डोळय़ांनी भक्ष्यावर नजर ठेवून, झडप घालण्यासाठी मोठय़ा पंखांचा वापर करून, अणकुचीदार नखांनी भक्ष्यांवर हल्ला करू न त्याला उचलून नेते. ही सर्व क्रिया काही क्षणात करत असल्याने घारीला शिकारी पक्षी म्हटले जाते.
गरुड, ससाणा व गिधाडे याप्रमाणे घार देखील फॅल्कॉनिफॉर्मिस पक्षीगणातील अॅक्सिपिट्रीडी कुलातील पक्षी आहे. घारीला मिल्व्हस मायग्रान्स हे शास्त्रीय नाव आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे २,५०० मी. उंचीपर्यंत घार आढळते. घार हा वन्यपक्षी असला तरी तिला माणसाचे वावडे नाही. त्यामुळे गजबजलेल्या दाट वस्तीच्या शहरी भागातही ती दिसते. सांडपाण्याची गटारे, उकिरडे, मासळी बाजार, क्षेपणभूमी, खाडीकिनारी घारींचा थवा दिवसभर घिरटय़ा घालताना दिसतो. कावळय़ाप्रमाणे मनुष्यवस्तीतील घाण नष्ट करण्याची कामे घारी करतात.
बेडूक, सरडा, उंदीर, घुशी, साप हे घारींचे भक्ष्य आहे. आकाशात उडत असताना तीक्ष्ण दृष्टीने जमिनीकडे नजर ठेवून असते. वेगाने खाली झेप घेऊन भक्ष्यावर झडप घालून नखांनी पकडते. भारतात काळय़ा घारीच्या दोन उपजाती आढळून येतात. एक स्थानिक आणि एक परदेशातून हिवाळी स्थलांतर करून येते. स्थानिक व परदेशी दोन्ही घारींचा रंग हा गडद तपकिरी असल्याने त्या दोघींमधील फरक ओळखणे थोडे कठीण जाते. घार आकाराने गरुडापेक्षा काहीशी लहान असून तिची लांबी ५० ते ६० सेमी असते. डोके बसके आणि तपकिरी रंगाचे, चोच दणकट अणकुचीदार आकडय़ासारखी आणि काळी असते. पाय आखूड व पिवळे असून त्यावर तपकिरी पिसे असतात. नखे तीक्ष्ण आणि टोकदार, मोठे पंख, लांब दुभागलेली शेपूट असते. आकाशात उडताना दुभागलेल्या शेपटीमुळे आणि पंख पसरून तरंगत राहत असल्याने घारी सहज ओळखता येतात. घार एकटी किंवा चार ते पाच जणाच्या गटाने आकाशात भ्रमंती करत असते.
शहरीकरणामुळे उंच झाडांची संख्या कमी झाल्याने घारी मोबाइल टॉवर, विजेचे खांब, मोठमोठय़ा बॅनरच्या कोपऱ्यात घरटी बांधू लागल्या आहेत.
तसेच, घरटय़ांच्या जागांबरोबरच घरटे बांधण्याचे साहित्यही त्यांनी बदलले आहे. घारीच्या घरटय़ांमध्ये आता झाडाच्या काटक्या, वाळलेली पाने, दोऱ्यांसोबतच छोटय़ा विद्युत तारा, नायलॉनचे धागेही दिसून येतात. घारीचा विणीचा हंगाम सप्टेंबर ते एप्रिलपर्यंत असतो. मादी घार मातकट – पांढऱ्या रंगाची आणि त्यावर लालसर – तपकिरी ठिपके असलेली अंडी घालते. उंच आकाशात पतंग उडवल्याने, आकाशात फटाक्यांची आतषबाजी केल्यामुळे घारी जखमी आणि मृत्यू होण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. वाढत्या तापमानात वाढीमुळे घारींना उन्हाचा त्रास असह्य होऊ लागला आहे. परंतु, घारींनी बदलेली परिस्थितीत जमवून घेतल्याने, मुबलक अन्नपदार्थ असल्याने घारींची संख्या स्थिर आहे.