कर्करोगग्रस्तांसाठी रक्त उपलब्ध होत नसल्याने रक्तदान करण्याचे टाटा स्मारक रुग्णालयाचे आवाहन

मुंबई : निर्बंध शिथिल झाल्यानंतर रुग्णालयातील शस्त्रक्रिया, रुग्णांची संख्या यात वाढ झाली असून त्या तुलनेत रक्ताचा साठा उपलब्ध नसल्यामुळे मुंबईत गेल्या काही दिवसांपासून मोठय़ा प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. कर्करोग रुग्णांवर उपचार करणाऱ्या परळ येथील टाटा स्मारक रुग्णालयात रुग्णांसाठी रक्त उपलब्ध होत नसल्यामुळे रक्तदान करण्याचे आवाहन रुग्णालयाने केले आहे.

करोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही महिन्यांपासून कमी झाल्यामुळे रुग्णालयांमध्ये शस्त्रक्रिया पूर्ववत झाल्या आहेत. परंतु त्या तुलनेत रक्तदान शिबिरांचे आयोजन होत नसल्याने किंवा रक्तदाते रक्तदान करत नसल्यामुळे शहरात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. याचा फटका अन्य रुग्णांसह कर्करोग रुग्णांनाही बसत आहे.

टाटा स्मारक रुग्णालयात कर्करोग रुग्णांच्या शस्त्रक्रिया मोठय़ा संख्येने होत असल्यामुळे या रुग्णालयाला मोठय़ा प्रमाणात रक्ताची आवश्यकता असते. निर्बंध शिथिल झाल्यावर रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. परंतु त्या तुलनेत रक्तदात्यांचा ओघ वाढलेला नाही. त्यामुळे रुग्णालयाला आवश्यक प्रमाणात रक्ताचा साठा उपलब्ध होत नसल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनाच रक्त उपलब्ध करण्यास सांगितले जात आहे.

रोहिदास नाईक यांच्या पत्नीला कर्करोग असून त्यांची शस्त्रक्रिया सोमवारी करण्यात येणार आहे. परंतु रुग्णालयात रक्त उपलब्ध नसल्यामुळे रुग्णालयाने त्यांना बाहेरून रक्ताची सुविधा करण्यास सांगितले. ‘मुंबईत आम्ही तीन ते चार रक्तपेढय़ांमध्ये रक्त मिळविण्याचे प्रयत्न केले. परंतु कोठेच सोय झाली नाही. शेवटी ओळखीतून मोठय़ा रुग्णालयातून रक्ताची सोय झाली आहे’, असे रोहिदास यांनी सांगितले. बहुतेक जण करोनातून नुकतेच बरे झाले आहेत. ते रक्तदान करण्यास तयार नाहीत, तर दुसरीकडे अनेक तरुण मंडळी सध्या गणपतीनिमित्त गावी गेलेली आहेत. त्यामुळे दाते मिळण्यासही अडचणी येत आहेत, अशी माहिती रोहिदास यांनी दिली.

‘माझ्या आईची जसलोक रुग्णालयात बुधवारी शस्त्रक्रिया होती. मंगळवारी रुग्णालयाने रक्त उपलब्ध नाही सांगितल्यावर धावपळ सुरू झाली. आम्ही सोलापूरचे असल्यामुळे मुंबईत ओळखीही नसल्यामुळे रक्त कोठून उपलब्ध करावे हे समजत नव्हते. अखेर चार ते पाच तास फोनवर अनेकांशी संपर्क साधल्यावर रक्त मिळाले’, असे अर्चना खरात यांनी सांगितले.

मुंबईत मोठय़ा प्रमाणात रक्ताचा तुटवडा असून त्याचा रुग्णसेवेवर गंभीर परिणाम होत आहे. टाटा रुग्णालयात हजारो रुग्णांवर उपचार केले जात असून रक्ताची मोठी आवश्यकता आहे. तेव्हा दात्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन टाटा स्मारक रुग्णालयाचे संचालक डॉ. सी. एस. प्रमेश यांनी केले.

मोठय़ा रुग्णालयांमध्येही रक्ताचा साठा कमी

मुंबईतील मोठय़ा रुग्णालयांशी संबंधित रक्तपेढय़ांमध्येही रक्ताचा साठा फारसा उपलब्ध नाही. सेंट जॉर्ज रुग्णालयात १२ युनिट, जे.जे.मध्ये ८२ युनिट, कूपर रुग्णालयात २१ युनिट, जीटी रुग्णालय २० युनिट, भाभा रुग्णालयात १३ युनिट, लोकमान्य टिळक रुग्णालयात (शीव) १६ युनिट, राजावाडी रुग्णालयात २१ तर वाडिया रुग्णालयात २५ युनिट रक्त उपलब्ध आहे.

थॅलेसेमियाच्या बालकांची वणवण

मुंबईत ५० टक्के रक्तसाठा हा खासगी कार्यालये आणि महाविद्यालयांमधून उपलब्ध होतो. निर्बंध खुले झाले तरी येथे शिबिरांचे आयोजन अजूनही पुरेशा प्रमाणात होत नाही. शहरात २३०० थॅलेसेमियांच्या बालकांना दर १५ दिवसांनी रक्ताची आवश्यकता असते. या बालकांना महिन्याला जवळपास नऊ ते दहा हजार युनिटची गरज असते. परंतु रक्तदानच तेवढय़ा प्रमाणात होत नसल्यामुळे दीड वर्षे त्यांची रक्तासाठी वणवण सुरू आहे. कार्यालयांसह गृहनिर्माण संकुलांमध्ये शिबिरांचे आयोजन मोठय़ा प्रमाणात करणे गरजेचे आहे, असे मत ‘थिंक फाऊंडेशन’चे विनय शेट्टी यांनी व्यक्त केले.