इंधन बचत करून प्रदूषण टाळण्यासाठी चौथा दिवा

निशांत सरवणकर, मुंबई</strong>

सिग्नलमुळे थांबलेल्या वाहनांना इंजिन बंद आणि पुन्हा सुरू करण्याची सूचना देणारा मुंबईतील दोन बहिणींनी तयार केलेला निळा सिग्नल आता नागपुरात लावला जाणार आहे. नागपूर शहर पोलिसांच्या वाहतूक विभागाने याबाबतचा प्रस्ताव महापालिकेला सादर केला आहे.

कुठल्याही शहरात वाहतूक सिग्नलवर अन्य परिसरांच्या तुलनेत २३ पट अधिक प्रदूषण असते. त्यामुळे शेकडो लिटर इंधन वाया तर जातेच शिवाय पर्यावरणाचा ऱ्हासही होतो. सिग्नलवर सर्वानीच वाहन बंद केले तर हे टाळता येईल, अशी साधी संकल्पना नजरेपुढे ठेवून निळ्या रंगाच्या सिग्नलची संकल्पना शिवानी व ईशा खोत या भगिनींनी मांडली. आयआयटीच्या टेकफेस्टमध्ये या प्रकल्पाची देशभरातून निवड झाली. दिल्ली येथे झालेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठीय विज्ञान अन्वेषण संशोधन महोत्सवात या प्रकल्पाला सुवर्णपदक मिळाले. केंद्रीय सार्वजनिक बांधकाममंत्री नितीन गडकरी यांनीही त्याचे कौतुक केले. दिल्लीत हा प्रकल्प पथदर्शी म्हणून राबविता येईल का, याची चाचपणी करण्याचे आदेशही देण्यात आले. आता नागपूर पोलिसांनी हा प्रकल्प शहरात राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

नागपूर शहराचे वाहतूक उपायुक्त राजतिलक रोशन यांनी याबाबतचा प्रस्ताव महापालिकेत मंजुरीसाठी सादर केला आहे.  याबाबत त्यांनी शिवानी यांच्याशी संपर्क साधून माहितीही घेतली. वाहतूक पोलिसांनी सादर केलेला हा प्रकल्प महापालिका मंजूर करेल,  अशी आशा नागपूरचे पोलीस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय यांनी व्यक्त केली.

प्रयोगाची जन्मकथा

दिल्लीतील विज्ञान स्पर्धेसाठी ईशाची निवड झाली होती. त्याकरिता प्रकल्पासाठी विचार करत असताना तिला सिग्नलजवळ होणाऱ्या प्रदूषणाचा मुद्दा दिसला.  हे प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने तिने विचार सुरू केला. यातूनच चौथ्या रंगाच्या सिग्नलची निर्मिती झाली. त्यासाठी तिला मानसशास्त्रात पदवीचे शिक्षण घेणाऱ्या शिवानी या बहिणीची मदत मिळाली. सिग्नल सुरू झाल्यानंतर आणि बंद होण्यापूर्वी प्रत्येकी १० सेकंद हा निळा दिवा लागेल तेव्हा चालकांनी इंजिन बंद करावे, अशी ही संकल्पना आहे.