‘मेक इन इंडिया’च्या आगीचा पालिकेला आठ लाखांचा भरुदड

आगीत भस्मसात झालेल्या व्यासपीठाचा कचरा उचलण्यासाठी पालिकेला आठ लाख रुपयांचा खर्च झाला आहे.

‘मेक इन इंडिया’ उपक्रमादरम्यान गिरगाव चौपाटीवर लागलेल्या आगीत भस्मसात झालेल्या व्यासपीठाचा कचरा उचलण्यासाठी पालिकेला आठ लाख रुपयांचा खर्च झाला आहे. हा खर्च संबंधित कंत्राटदाराकडून वसूल करणे आवश्यक असले तरी पालिकेने आठ दिवसांपूर्वी पाठवलेल्या पत्राला कंत्राटदाराने आजतागायत प्रतिसादही दिलेला नाही. गिरगाव चौपाटीवर १४ फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या कार्यक्रमादरम्यान व्यासपीठाला लागलेली आग विझवल्यानंतर पालिकेच्या डी विभागाकडून या जागेची तातडीने सफाई करण्यात आली. यासाठी १० जेसीबी यंत्र, डंपरच्या ३९ फेऱ्या, २ कोम्पॅक्टोर्सची मदत घेतली गेली. १९८ कामगार आणि ८० अधिकारी दोन पाळय़ांत काम करीत होते. दिवसभरात तब्बल ३१५ मेट्रिक टन कचरा उचलण्यात आला. यासाठी तब्बल आठ लाख ६ हजार ९५२ रुपये खर्च आल्याची माहिती डी विभागातील घनकचरा व्यवस्थापन खात्याचे साहाय्यक अभियंता यांनी माहिती अधिकाराअंतर्गत अनिल गलगली यांना दिली. अग्निशमन दलाकडून पालिका आयुक्तांना सादर करण्यात आलेल्या अहवालात आगीच्या घटनेसाठी या कार्यक्रमाच्या आयोजकांना जबाबदार धरण्यात आले आहे. परवानगी नसतानाही ज्वलनशील वस्तूंचा साठा कार्यक्रमस्थळी ठेवल्याने आग भडकली असे अहवालात म्हटले आहे. याबाबत संबंधित कंत्राटदारावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
आग विझल्यानंतर पालिकेने तातडीने साफसफाई केली असली तरी याचा खर्च कंत्राटदाराने देणे आवश्यक आहे, मात्र कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीचे विभागीय संचालक कौशलेन्द्र सिन्हा यांनी पालिकेच्या पत्राला अजूनही उत्तर दिलेले नाही. २२ फेब्रुवारी २०१६ रोजी पाठविलेल्या पत्रात सात दिवसांत रक्कम भरण्याची वेळ दिली होती. ही मुदत संपल्यावरही त्यांचा प्रतिसाद आला नसल्याने पालिकेने त्यांच्याविरोधात कारवाई करावी, अशी मागणी गलगली यांनी पत्राद्वारे पालिका आयुक्तांना केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bmc 8 lakh fine in make in india fire case