मुंबई : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करताना गणेशमूर्ती विसर्जनासाठी मुंबई महापालिकेने मोठ्या प्रमाणावर कृत्रिम तलाव तयार केले होते. या तलावांमध्ये गणेशमूर्ती विसर्जन करण्याच्या आवाहनाला गणेशभक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून तब्बल ९७.२७ टक्के गणेशमूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले. मुंबई महानगरपालिका प्रशासनाने यंदा उपलब्ध केलेल्या ३८३ कृत्रिम तलावांमध्ये गणेश विसर्जन करण्यात आले.
गेल्या काही वर्षांपासून मुंबई महापालिकेतर्फे गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार केले जात होते. मात्र त्यावेळी कृत्रिम तलावातील विसर्जन हे ऐच्छिक होते. त्यामुळे त्याला फारसा प्रतिसाद नव्हता. करोना काळातील गणेशोत्सवात प्रथमच ५७ टक्के मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. मात्र दोन वर्षांपासून पीओपीच्या मूर्तींचा वाद न्यायालयात पोहोचला असून सहा फुटापेक्षा कमी उंचीच्या मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यामुळे मुंबई महापालिकेने यंदा मुंबईत विविध ठिकाणी ३८३ कृत्रिम तलाव, तसेच समुद्रकिनारे, चौपाट्या आणि अन्य ठिकाणी अशी ६७ नैसर्गिक विसर्जन स्थळे उपलब्ध करून दिली आली होती. ६ फुटांपर्यंतच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलावांचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला होता. तसेच मुंबईतील नैसर्गिक जलस्रोतांवर विसर्जनामुळे होणारा पर्यावरणीय परिणाम कमी करण्याच्या दृष्टीने कृत्रिम तलावात गणेशमूर्ती विसर्जित करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते. नागरिकांच्या घराजवळ असलेले मोकळे भूखंड, उद्याने, मैदान येथे कृत्रिम तलावांची सुविधा उपलब्ध करून दिली होती. यासाठी प्रभावीपणे जनजागृती देखील केली होती. परिणामी विविध चौपाट्यांवर मूर्ती विसर्जनासाठी गर्दी कमी झाली होती.
एकूण १ लाख ९७ हजार मूर्तींचे विसर्जन
यंदा गणेशोत्सवात मुंबईत एकूण १ लाख ९७ हजार ३८२ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यापैकी ६ फुटांपर्यंतच्या एकूण १ लाख ९२ हजार २३७ गणेशमूर्तींचे ३८३ कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करण्यात आले. यामध्ये १ लाख २२ हजार ३९१ पीओपी मूर्ती आणि ६९ हजार ८४६ शाडू मातीच्या मूर्तींचा समावेश आहे. तर ६ फुटांपेक्षा अधिक उंचीच्या ५ हजार ३८२ गणेशमूर्तींचे ६७ नैसर्गिक विसर्जन स्थळांवर विसर्जन करण्यात आले. यामध्ये ५ हजार २५९ पीओपी आणि १२३ शाडू मातीच्या मूर्तींचा समावेश आहे.
९७ टक्के मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात
कृत्रिम तलावांमध्ये विसर्जित करण्यात आलेल्या ६ फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींची संख्या १ लाख २२ हजार ३९१, तर शाडू मातीच्या मूर्तींची संख्या ६९ हजार ८४६ आहे. अशा प्रकारे ६ फुटांपर्यंतच्या एकूण १ लाख ९२ हजार २३७ मूर्तींचे कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करण्यात आले. त्याचवेळी ६ फुटांपेक्षा अधिक उंचीच्या मूर्तींसाठी नैसर्गिक विसर्जन स्थळांचा वापर करण्यात आला. या ठिकाणी ५ हजार २५९ पीओपी आणि १२३ शाडू मातीच्या अशा एकूण ५ हजार ३८२ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
