मुंबई : काळा घोडा परिसरातील सशुल्क वाहनतळावर निश्चित केलेल्या शुल्कापेक्षा अधिक शुल्क आकारणी केली जात असल्याची घटना उघडकीस आली आहे. या वाहनतळावर शुल्क वसुलीसाठी नेमलेल्या कंत्राटदार संस्थेवर मुंबई महापालिका प्रशासनाने दंडात्मक कारवाई केली आहे. तसेच, वाहनधारकांकडून अनधिकृतपणे शुल्क वसुली करणाऱ्या संस्थेच्या कर्मचाऱ्यांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तसेच कंत्राटदार संस्थेला काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.
दक्षिण मुंबईतील रस्त्यांवरच्या वाहनतळांवर जादा शुल्क आकारणी केल्याच्या घटना अनेकदा उघडकीस आल्या आहेत. तसाच आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. काळा घोडा परिसरातील जहांगीर आर्ट गॅलरी आणि व्ही. बी. गांधी मार्ग येथे एकूण १०० चारचाकी तसेच ४५ दुचाकी वाहनांसाठी सशुल्क वाहनतळाचे कंत्राट एका संस्थेला देण्यात आले आहे. दुचाकी वाहनासाठी प्रति तास २० रुपये आणि चारचाकी वाहनासाठी प्रति तास ७० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. मात्र मुंबई महानगरपालिकेने कंत्राटात निश्चित केलेल्या शुल्कापेक्षा या संस्थेचे प्रतिनिधी अधिक शुल्क आकारणी करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.
जादा शुल्क आकारणी करणाऱ्या कंत्राटदार संस्थेला ९ मे रोजी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली. तसेच, निश्चित केलेल्या शुल्कापेक्षा अधिक शुल्क आकारणी करुन वाहनधारकांची आर्थिक पिळवणूक केल्याबद्दल १० हजार रुपये, निर्देशित जागे ऐवजी ‘नो पार्किंग’ क्षेत्रात वाहने उभी करुन शुल्क आकारणी केल्याबद्दल ४ हजार रुपये आणि प्रतिनिधींनी गणवेश तथा अधिकृत ओळखपत्र धारण न केल्याबद्दल १ हजार रुपये असे एकूण १५ हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात आली. संस्थेच्या प्रतिनिधींविरोधात माता रमाबाई मार्ग पोलिस स्थानकात प्रशासनाकडून लेखी तक्रार दाखल करण्यात आली असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
‘स्टींग ऑपरेशन’ने प्रकार उघडकीस
पालिका उपायुक्त डॉ. संगीता हसनाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ए’ विभागाचे सहायक आयुक्त जयदीप मोरे यांच्या नेतृत्वात ‘स्टींग ऑपरेशन’चे नियोजन करण्यात आले. अन्य विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वत:ची ओळख पटू नये, या पद्धतीने खासगी वाहनांचा वापर केला. याठिकाणी पालिकेचेे ‘नो पार्किंग’चे फलक झाकून त्या ठिकाणी संस्थेची वाहने, तसेच संस्थेचे प्रतिनिधी गणवेश परिधान करत नसल्याचेही निदर्शनास आले.
तर नागरिकांनी तक्रार करावी
मुंबई महानगरपालिकेच्या सशुल्क वाहनतळाच्या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आलेल्या फलकावर उल्लेखित शुल्कापेक्षा अधिक वाहनतळ शुल्क आकारणी केली जात असेल. संबंधित वाहनतळासंदर्भात काही सूचना किंवा तक्रारी असतील तर संबंधित विभाग कार्यालयाकडे तात्काळ तक्रार नोंदवावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून नागरिकांना करण्यात येत आहे