मुंबई : मुंबईत सुमारे ९४ टक्के नागरिकांनी लशीची पहिली मात्रा घेतली असून ऑक्टोबरअखेपर्यंत म्हणजेच दिवाळीपूर्वी पहिली मात्रा घेतलेल्यांचे प्रमाण १०० टक्के करण्याचे उद्दिष्ट पालिकेने निश्चित केले आहे. शहरात ५३ टक्के नागरिकांच्या लशीच्या दोन्ही मात्रा पूर्ण झालेल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकीकडे शहरात सिनेमागृहापासून ते शाळा, महाविद्यालये, दुकानांवरील शिथिल केलेले निर्बंध आणि दुसरीकडे आगामी दिवाळी सणाच्या निमित्ताने शहरात होणारी गर्दी या पार्श्वभूमीवर लसीकरण वेगाने करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. दिवाळीपूर्वी किमान पहिल्या मात्रेचे प्रमाण १०० टक्के करण्याचे लक्ष्य पालिकेने ठेवलेले आहे. लसीकरण घरापर्यंत पोहोचविण्यासाठी विभागांतील झोपडपट्टय़ा, काही इमारतींच्या आवारात आवश्यकतेनुसार लसीकरण शिबिरे आयोजित करण्याच्या सूचना पालिकेने विभागीय साहाय्यक आयुक्तांना दिल्या आहेत. तसेच लसीकरणासाठी अत्यावश्यक सेवायुक्त फिरत्या रुग्णवाहिकाही पालिकेने कार्यरत केल्या आहेत.

मुंबईत पहिली मात्रा घेणाऱ्यांचे प्रमाण आता जवळपास ९४ टक्के झाले आहे. हे प्रमाण ऑक्टोबरअखेपर्यंत १०० टक्क्यांवर नेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विभागांना दिलेल्या सूचनेनुसार अंधेरी पश्चिम, दहिसर, कुलाबा  आणि आसपासच्या परिसरांमध्ये आवश्यकतेनुसार इमारती, झोपडपट्टय़ांमध्येही लसीकरण शिबिरांचे आयोजन करण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईतील अन्य भागांमध्येही अशा शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.

आसपासच्या शहरांतील नागरिकांनी मुंबईतील लसीकरण केंद्रांवर लस घेतली आहे. त्यामुळे पहिल्या मात्रेचे लसीकरण १०० टक्के झाले तरी लसीकरणापासून वंचित राहिलेल्या मुंबईकरांचे लसीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरूच ठेवले जाणार आहेत, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

दुसऱ्या मात्रेसाठी प्रतीक्षा

मुंबईतील अनेक नागरिक दुसऱ्या मात्रेची नियोजित वेळ येण्याची वाट पाहत आहेत. सध्या लशींचा साठा मोठय़ा प्रमाणात उपलब्ध असून दुसऱ्या मात्रेचे लसीकरण मोठय़ा प्रमाणात होत आहे, कोव्हिशिल्डची पहिली मात्रा घेतल्यानंतर दुसरी मात्रा ८४ दिवसांनी घ्यावी लागते. यामुळे बहुतांश नागरिकांची दुसरी मात्रा राहिलेली आहे. येत्या काही काळात दोन्हा मात्रा पूर्ण झालेल्याचे प्रमाणही वाढेल, असे मत काकाणी यांनी व्यक्त केले.

९२,३६,५४६ मुंबईतील १८ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांची संख्या

८६,४८,९९८ पहिली मात्रा घेतलेल्यांची संख्या

४९,२३,७७३ दोन्ही मात्रा पूर्ण झालेल्यांची संख्या

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bmc aims to achieve 100 percent vaccination by the end of the month zws
First published on: 21-10-2021 at 02:23 IST