मुंबई : मुंबई महानगरपालिकेने नागरिकांच्या सुविधेसाठी शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरांत अनेक ठिकाणी ठेवलेल्या सार्वजनिक कचराकुंड्यांमुळे परिसराला बकाल रूप येऊ लागले असून कचऱ्याने ओसंडून वाहणाऱ्या कचराकुंड्या, खाद्याच्या शोधात त्यांच्या आसपास फिरणारी भटकी जनावरे, पसरणारी दुर्गंधी आणि निर्माण होणारे आरोग्याचे प्रश्न अशा निरनिराळ्या समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. यावर तोडगा म्हणून महानगरपालिकेने पुढील चार वर्षांत मुंबई कचराकुंडीमुक्त करण्याचा संकल्प सोडला असून टप्प्याटप्प्याने मुंबईतील सार्वजनिक कचराकुंड्या हटवून घराघरातील कचरा इमारतीबाहेरून ताब्यात घेण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे.
मुंबई महानगरपालिकेने मुंबई स्वच्छता राखण्यासाठी, नागरिकांना कचरा टाकता यावा यासाठी झोपडपट्ट्या, वस्त्या, चाळी, मंडया, बाजारपेठा तसेच सार्वजनिक ठिकाणी भल्यामोठ्या सार्वजनिक कचराकुंड्या उपलब्ध केल्या आहेत. परिसरातील रहिवासी, दुकानदार, हॉटेलचालक आदी मंडळी दिवसभराचा कचरा या कचराकुंड्यांमध्ये टाकतात. महानगरपालिकेची कचरावाहू वाहने या कचराकुंड्यांमधील कचरा कचराभूमीमध्ये घेऊन जातात. मात्र कचरावाहू वाहने वेळीच येत
कचराकुंड्या कचऱ्याने ओसंडून वाहतात. कचराकुंड्यांलगत कचऱ्याचे ढिग साचतात. साचलेल्या कचऱ्यात खाद्याचा शोध घेण्यासाठी भटकी जनावरांचा वावर वाढतो आणि जनावरे कचरा अस्ताव्यस्त करतात. बराच वेळ कचरा पडून राहिल्याने परिसरात दुर्गंधी पसरते, कचऱ्यातील दुर्गंधीयुक्त पाण्याचा पाट रस्त्यावरून वाहू लागतो. त्यामुळे परिसरातील रहिवाशांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. या समस्यांचे मुळ असलेल्या सार्वजनिक कचराकुंड्याच परिसरातून हटविण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन विभागाने घेतला आहे.
येत्या चार वर्षांमध्ये मुंबई कचराकुंडीमुक्त करण्याचा संकल्प घन कचरा व्यवस्थापन विभागाने सोडला आहे. मुंबई शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये स्वच्छता राखली जावी यासाठी झोपडपट्ट्या, चाळी, मंडया, बाजारपेठा आदी ठिकाणी तब्बल ३ हजार ५०० कचराकुंड्या उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तसेच नागरिकांच्या घरातील, हॉटेल्स, कार्यालये आदी ठिकाणचा कचरा एकाच ठिकाणी गोळा करून पुढे तो कचरावाहू वाहनांमधून कचराभूमीत टाकण्यात येतो.
मुंबईतील तब्बल १५ हजारांहून अधिक ठिकाणी कचरा गोळा करून तो कचराभूमीत वाहून नेण्यात येतो. मात्र काही वेळा कचराकुंड्यांमधील कचरा तसाच पडून राहतो. हळूहळू कचाराकुंडी कचऱ्याने भरून ओसंडू लागते. त्यामुळे परिसराला बकाल रूप येते. त्याचबरोबर दुर्गंधी आणि आरोग्याचे प्रश्नही निर्माण होतात. ही बाब लक्षात घेऊन मुंबईतील कचराकुंड्या टप्प्याटप्प्याने हटविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
कचराकुंड्या हटविल्यानंतर घराघरातील कचरा संबंधित इमारतीजवळूनच गोळा करण्यासाठी महापालिकेने २४ विभाग कार्यालयांचे नऊ गट तयार केले असून कंत्राटदारांची नेमणूक केली आहे. नऊपैकी एका गटातील एल, एम-पूर्व, एम-पश्चिम या विभाग कार्यालयांच्या हद्दीतील कचरा कचराभूमीत नेण्याचे काम महानगरपालिकेचे सफाई कामगारांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेची स्वमालकीची वाहने आणि यंत्रणेचा वापर करण्यात येणार आहे. तर उर्वरित आठ गटांच्या हद्दीतील कचरा उचलून कचराभूमीत टाकण्यासाठी कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
नियुक्त केलेले कंत्राटदार भविष्यात घराघरातील कचरा इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळून घेऊन कचराभूमीत टाकणार आहेत. त्यामुळे कचराकुंडीची आवश्यकताच भासणार नाही, असे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. महापालिकेच्या नियोजनानुसार प्रत्येक वर्षात २५ टक्के कचराकुंड्या हटविण्यात येणार आहेत. येत्या सप्टेंबरपासून मुंबईमधील २५ टक्के कचराकुंड्या हटविण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. पुढील चार वर्षांमध्ये मुंबई कचराकुंडी मुक्त होईल, असा विश्वास या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
