मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय आरोग्य विभागाकडून देवनार पशुवधगृह आणि महालक्ष्मी येथे लहान प्राणी व पक्ष्यांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी दहनवाहिनी सुरू करण्यात आली आहे.
लहान प्राण्यांसाठी दहनवाहिनी कार्यान्वित करण्याबाबत उच्च न्यायालयाने निर्देश दिले होते. यापूर्वी मालाडमध्ये अशा प्रकारची मृत प्राण्यांसाठी दहनवाहिनी सुरू करण्यात आली होती. त्यामुळे मुंबईत शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये स्वतंत्रपणे दहनवाहिन्यांची सुविधा उपलब्ध झाली आहे.
पाळीव प्राण्यांचा आणि रस्त्यांवरील भटक्या प्राण्यांचा मृत्यू झाला की त्यांच्या मृतदेहाची कशी वाट लावायची याचा मोठा प्रश्न असतो. मुंबईत प्राण्यांचे मृतदेह पुरण्यासाठी पुरेशी जागाही नाही. त्यामुळे प्राण्यांच्या मृतदेहाचे दहन करण्यासाठी पालिकेने तीन ठिकाणी दहनभट्ट्या सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यापैकी मालाड येथे प्राण्यांची पहिली दहनवाहिनी आधीच सुरू करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ आता महालक्ष्मी आणि देवनार येथे मृत प्राण्यांसाठी दहनवाहिनी सुरू करण्यात आली आहे. लहान मृत प्राण्यांचे शास्त्रोक्त आणि पर्यावरणपूरक पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यासाठी १ एप्रिलपासून दहनवाहिन्यांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती पालिका अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी दिली.
पाचशे किलो वजनाच्या प्राण्यांचे दहन…
देवनार पशुवधगृह आणि महालक्ष्मी येथील टाटा ट्रस्ट संचालित प्राण्यांच्या रुग्णालय परिसरात दहनवाहिनी (इन्सिनरेटर) सुरू करण्यात आली आहे. यापैकी देवनार येथील दहनवाहिनीत ५०० किलो वजनापर्यंतचे प्राणी किंवा पक्ष्यांचे अंत्यसंस्कार करता येऊ शकतात. ही दहनवाहिनी स्वच्छ व पर्यावरणपूरक असलेल्या पीएनजी इंधनावर चालते. महालक्ष्मी येथील दहनवाहिनीत ५० किलो वजनापर्यंतचे प्राणी किंवा पक्ष्यांचे अंत्यसंस्कार करता येऊ शकतात. ही दहनवाहिनी पूर्णत: वीजेवर (इलेक्ट्रीक) चालणारी आहे. तर, मालाड येथे सन २०२३ पासून दहनवाहिनी कार्यरत आहे.
या संकेतस्थळाच्या माध्यमातून नोंदणी…
दहनवाहिनी तसेच प्राण्यांसंदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पशूवैद्यकीय आरोग्य विभागाच्या वतीने https://vhd.mcgm.gov.in या संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तर https://vhd.mcgm.gov.in/incineration-booking या लिंकवर नोंदणी करुन, निवडलेल्या विहित वेळेत निवडलेल्या दहनवाहिनीच्या ठिकाणी मृत प्राण्याचे अंत्यविधी करता येतील. तसेच, अधिक माहिती किंवा मदतीसाठी ७५६४९७६६४९ या मदतसेवा क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पशूवैद्यकीय आरोग्य विभाग प्रमुख डॉ. कलिमपाशा पठाण यांनी महानगरपालिका प्रशासनाकडून केले आहे.
