मुंबई : कुलाबा मलजल सांडपाणी प्रकल्पातून प्रक्रिया केलेल्या ३ दशलक्ष लिटर पाण्याची मेसर्स एस. आर एंटरप्राईजेस या महिला बचत गट संस्थेला विक्री करण्यास स्थायी समितीने हिरवा कंदील दाखवला आहे. महापालिकेकडून संबंधित संस्थेला सुमारे ३ वर्षांच्या कालावधीसाठी १५ रुपये प्रति १ हजार लिटर दराने प्रक्रिया केलेल्या पाण्याची विक्री केली जाणार आहे. दरम्यान, कुलाबा मलजल प्रकल्पातील प्रक्रिया केलेले सांडपाणी भविष्यात खासगी, निम शासकीय, शासकीय संस्थांनाही विकण्यास मंजुरी देण्यात आली.

मुंबई मलनिःसारण प्रकल्प भाग – २ अंतर्गत कुलाबा मलजल प्रक्रिया केंद्राचे प्रचालन व परिरक्षणाचे काम एप्रिल २०२० पासून पुढील १५ वर्षासाठी मेसर्स सुएझ इंडिया प्रा. लि. यांना देण्यात आले आहे. हा प्रकल्प प्रतिदिन ३७ दशलक्ष लिटर इतक्या क्षमतेचा असून त्यापैकी १० दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. या प्रक्रियेदरम्यान सांडपाणी अधिक शुध्द होऊन त्याचा पुनर्वापर पेयत्तर वापरासाठी म्हणजेच बांधकाम, उद्याने, तसेच इतर सफाई कारणासाठी केला जाऊ शकतो. प्रक्रिया केलेले सांडपाणी सागरी पातमुखांद्वारे समुद्रात १.१५ किमी अंतरावर सोडण्यात येते. मात्र, या पाण्याची विक्री केल्यास महापालिकेला महसूल वाढीसाठी मदत होईल.

सद्यस्थितीत भारतीय नौसेनेला o.५ ते १ दशलक्ष लिटर इतक्या पाण्याचा पेयत्तर वापरासाठी १ रुपये प्रति १ हजार लिटर दराने पुरवठा केला जातो. दरम्यान, मेसर्स एस. आर एंटरप्राईजेस या महिला बचत गट संस्थेनेही प्रतिदिन ३ दशलक्ष लिटर पाण्याची खरेदी करण्याची तयार दर्शविली. संस्थेतर्फे या पाण्याचा वापर एल. अँड टी ऑरेंज गेट टनेल कामासाठी व उद्यानांसाठी करण्यात येणार आहे. तसेच, या पाण्याची वाहतूक करण्याची संपूर्ण जबाबदारी संस्थेवर सोपविण्यात आली आहे. याबाबतचा प्रस्ताव बुधवारी स्थायी समितीसमोर मांडण्यात आला होता. मात्र, प्रक्रिया केलेल्या पाण्याचा अग्निशमन कामांसाठी वापर करावा, अशी मागणी करत शिवसेनेचे (ठाकरे) यशोधर फणसे यांनी प्रस्तावाला विरोध केला. मात्र, अखेरीस सत्ताधाऱ्यांनी बहुमताच्या जोरावर प्रस्ताव मंजूर केला.

कुलाबा मलजल सांडपाणी प्रकल्पातून प्रक्रिया केलेल्या पाण्याचा हवा तेवढा सदुपयोग होत नाही. त्यामुळे हे पाणी वापरण्यासाठी मुंबईकरांना प्रोत्साहित केले पाहिजे. प्रक्रिया केलेल्या पाण्याची खरेदी वाढल्यास भविष्यात आणखी ग्राहक पालिकेला मिळतील. त्यामुळे प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याची खरेदी करण्यास कोणी पुढाकार घेत असल्यास त्यावर आक्षेप घेऊ नये, असे आवाहन सभागृह नेते गणेश खणकर यांनी केले.

सागरी किनारा प्रकल्प व टेट्रापॉड टाकण्याच्या कामांसाठीही विक्री

यापूर्वी प्रकल्पातील प्रक्रिया केलेल्या पाण्याची २१ रुपये प्रति १ हजार लिटर दराने २०२० मध्ये समुद्रकिनारी टेट्रापॉड टाकण्याच्या कामांसाठीही विक्री करण्यात आली होती. सागरी किनारा मार्गाच्या कंत्राटदार कंपनीलाही मे २०२२ ते जून २०२२ या कालावधीत टनेल बोअरिंगच्या कामासाठी २ दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा करण्यात आला होता. दरम्यान, आता दी क्रिकेट क्लब ऑफ इंडियानेही ३ वर्षासाठी १०० दशलक्ष लिटर प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याची खरेदी करण्यास तयारी दर्शवली आहे.

महसूल प्राप्तीसह पिण्याच्या पाण्याची बचत

या प्रक्रिया केलेल्या पाण्याची पेयत्तर वापरासाठी विक्री केल्यास महानगरपालिकेसाठी महसूल प्राप्त होईल आणि कुलाबा मलजल प्रक्रिया केंद्राकरीता लागलेला भांडवली खर्च आणि प्रचालन व परिरक्षणावर होणारा आवर्ती खर्च काही प्रमाणात वसूल करता येईल. तसेच, याद्वारे पिण्याच्या पाण्याची बचत होण्यास मदत मिळेल.